महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ६०.०९ टक्के मतदान, महाराष्ट्रात किती मतदान झाले? - voter turn out in fifth phase

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली. देशभरात एकूण ६०.०९ टक्के मतदान झाले.

voting percentage in Lok Sabha
मतदान आकडेवारी (Source- ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 7:03 AM IST

Updated : May 21, 2024, 7:23 AM IST

हैदराबाद- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाकरिता पश्चिम बंगालमध्ये उत्साह दिसून आला. तर महाराष्ट्रात काही मतदारसंघात उदासीनता तर मुंबईसह उपनगरांमध्ये मतदारांना अडचणींचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणूक २०१९ च्या तुलनेत मुंबई, ठाणे, नाशिक आणि लखनौमध्ये मतदानाकरिता उत्साह दिसला नसल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडून खंत व्यक्त करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशभरात एकूण ६०.०९ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी मतदान हे महाराष्ट्रात झाले. भारतीय निवडणूक आयोगानं रात्री साडेअकरापर्यंत झालेल्या अंदाजित मतदानाची आकडेवारी जाहीर केली. झारखंडमध्ये ६३.०७ टक्के, लडाखमध्ये ६९.७२ टक्के, महाराष्ट्रात ५४.२९ टक्के, ओडिशामध्ये ६७.५९ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५७.७९ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७४.६५ टक्के मतदान झाले. बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात ५८.१७ टक्के मतदान झाले. १९६७ नंतरचे हे सर्वाधिक मतदान आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी दहशतावाद्यांनी माजी सरपंचांवर हल्ला करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही भीती झुगारून नागरिकांनी मतदान केले.

देशभरातील सहा राज्यांमध्ये सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दिवसभरात जवळपास ९ कोटी मतदारांनी मतदान केले. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. ही अंदाजित आकडेवारी संध्याकाळी सहावाजेपर्यंतची आहे.

  • धुळे- ५६.६१ टक्के
  • दिंडोरी- ६२.६६ टक्के
  • नाशिक - ५७.१० टक्के
  • पालघर- ६१.६५ टक्के
  • भिवंडी- ५६.४१ टक्के
  • कल्याण - ४७.०८ टक्के
  • ठाणे - ४९.८१ टक्के
  • मुंबई उत्तर – ५५.२१ टक्के
  • मुंबई उत्तर मध्य - ५१.४२ टक्के
  • मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के
  • मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७ टक्के
  • मुंबई दक्षिण – ४७.७० टक्के
  • मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के

देशभरातील हे हायप्रोफाईल नेते निवडणुकीच्या रिंगणात!-लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा हा लहान होता. यामध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (लखनौ), पीयूष गोयल (मुंबई उत्तर) आणि स्मृती इराणी (अमेठी), राहुल गांधी (राय) बरेली ), ओमर अब्दुल्ला (बारामुल्ला) आणि चिराग पासवान (हाजीपूर) यांच्यासह अनेकांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याणमधून रिंगणात आहेत. भाजपचे विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह हेदेखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बिहारच्या सारणमध्ये आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्यात २५ मे रोजी हरियाणा आणि दिल्लीसह ५८ जागांसाठी मतदान होणार आहे.

हेही वाचा-

  1. संथगतीनं मतदानाचा विरोधकांचा आरोप; "मतदान प्रक्रिया योग्यच", निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा - Lok Sabha Election 2024
  2. मतदानादिवशी मुंबईत दिवसभर काय-काय घडलं? निवडणूक आयोगानं दिली महत्त्वाची माहिती - Lok Sabha Election 2024
Last Updated : May 21, 2024, 7:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details