नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल मंगळवारी (8 ऑक्टोबर) जाहीर झाले. यात भाजपानं 48 जागा जिंकत बहुमताचा आकडा पार केला, तर काँग्रेसला 37 जागांवर विजय मिळाला. त्यामुळं आता हरियाणात भाजपा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. हरियाणाच्या निकालावर काँग्रेसनं सवाल उपस्थित करत भाजपावर हल्लाबोल केला.
काँग्रेसचे 'ईव्हीएम'वर सवाल : काँग्रेस पक्षानं पुन्हा एकदा 'ईव्हीएम'वर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'ईव्हीएम'बाबत अनेक तक्रारी माझ्याकडं आल्या असल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. 'ईव्हीएम'बाबत आलेल्या तक्रारींवर चर्चा होणं आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले.
हरियाणात 'ईव्हीएम'चा विजय : जयराम रमेश म्हणाले की, "हरियाणाच्या निवडणुकीत 'ईव्हीएम'चा विजय झाला आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीचा विजय झाला. हरियाणा निवडणुकीचे निकाल आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळं आम्ही तक्रारी घेऊन निवडणूक आयोगाकडं जाणार आहोत.'ईव्हीएम'कडं दुर्लक्ष करता येणार नाही."
निवडणूक आयोगाकडं दाद मागणार : "हरियाणा निवडणुकीबाबत जे काही विश्लेषण करायचं आहे ते आम्ही नक्कीच करू, पण खरी गोष्ट अशी आहे की आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. आमच्याकडून कुठे चुका झाल्या, याचाही विचार केला जाईल. आम्ही समिती स्थापन करून सर्व मुद्दे एकत्र करुन त्यावर मंथन केलं जाईल,"असं म्हणत जयराम रमेश यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय.
निकाल पाहून धक्का : काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, "हरियाणात लोकशाही हरली असून, तेथील व्यवस्था जिंकली आहे. हा पराभव आम्ही मान्य करू शकत नाही, आम्ही अनेक तक्रारी गोळा केल्या आहेत, आणखी अनेक तक्रारी गोळा करत आहोत, त्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाकडं जाणार आहेत. हरियाणातील निवडणुकीचे जे निकाल आले आहेत, ते पाहून आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे, त्यामुळं निकाल स्वीकारता येणार नाही."
हेही वाचा -
- आता कसं वाटतंय? देवेंद्र फडणवीसांचा हरियाणा विजयानंतर राऊतांना खोचक टोला
- हरियाणात 'कमळ' पुन्हा फुललं; कार्यकर्त्यांकडून जल्लोष, दसऱ्याला होणार शपथविधी