नवी दिल्ली Sitaram Yechury passed Away : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचं आज गुरुवारी निधन झालं. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. 72 वर्षीय सीपीआय(एम) नेते सीताराम येचुरी यांना यापूर्वी 19 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली होती.
सीताराम येचुरी यांच्याबद्दल: सीताराम येचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि पक्षाच्या संसदीय गटाचे नेते होते. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई येथे तेलुगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांना 2016 मध्ये राज्यसभेत सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात जेएनयूमध्ये असताना त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर ते सलग तीन वेळा जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1984 मध्ये त्यांना सीपीआय (एम)च्या केंद्रीय समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. 2015 मध्ये त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती.