मुंबई-भारतीय नौदलाच्या इतिहासात 15 जानेवारी 2025 हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. निलगिरी, सूरत या विनाशिका अन् वाघशीर ही पाणबुडी अशा तीन आघाडीच्या लढावू जहाजांचा ताफा भारतीय नौदलात सामील होणार आहे. एकाच दिवशी नौदलाच्या ताफ्यात दोन विनाशिका आणि एक पाणबुडी सामील होणार आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे या तिन्ही लढाऊ युद्धनौकांचं आरेखन आणि बांधणी करण्यात आलीय. या युद्धनौका निर्मितीच्या माध्यमातून संरक्षण उत्पादनासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा भारताने पुन्हा एकदा प्रत्यय दिलाय. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या युद्धनौका आणि पाणबुड्या यशस्वीरीत्या बनवून कार्यान्वित करण्यात आल्याने युद्धनौका आरेखन आणि बांधणी क्षेत्रात भारताने केलेल्या जलद प्रगतीवर प्रकाश पडलाय. यामुळे संरक्षण उत्पादनात भारताचे स्थान जागतिक पातळीवर उंचावून अधिक मजबूत झालंय.
ताफ्यात सामील होणाऱ्या जहाजांची वैशिष्ट्ये :निलगिरी हे प्रोजेक्ट 17 A स्टेल्थ फ्रिगेट अर्थात विनाशिका श्रेणीतील प्रमुख जहाज आहे. सूरत, हे प्रोजेक्ट 15 B स्टेल्थ डिस्ट्रॉयर श्रेणीतील चौथे आणि अंतिम जहाज आहे. वाघशीर पाणबुडी ही स्कॉर्पियन श्रेणी प्रकल्पाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे.
निलगिरी जहाज :हे प्रोजेक्ट 17 A चे प्रमुख जहाज आहे. शिवालिक श्रेणीतील युद्धनौकांच्या तुलनेत याला एक मोठा टप्पा गाठण्यात यश आलंय. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महत्त्वपूर्ण स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि कमी रडार सिग्नेचर (रडारद्वारे लक्ष्य शोधण्याचे साधन) समाविष्ट आहे.
सूरत : हे प्रोजेक्ट 15 B विनाशक जहाज असून, कोलकाता क्लास (प्रोजेक्ट 15 A) विनाशकांच्या फॉलो-ऑन क्लासचा सर्वोच्च बिंदू आहे. या जहाजांच्या आरेखन आणि क्षमतांमध्ये पूर्वीच्या तुलनेत अनेक सुधारणा करण्यात आल्यात. या दोन्ही जहाजांची रचना भारतीय नौदलाच्या युद्धनौका आरेखन ब्युरोने केलीय. हे विनाशक जहाज अत्यंत प्रगत सेन्सर्स आणि शस्त्रास्त्र साठ्याने सुसज्ज आहे. शत्रूच्या मनात धडकी भरवणारी ही शस्त्रास्त्रेदेखील प्रामुख्याने भारतात आणि आघाडीच्या जागतिक उत्पादकांसोबत धोरणात्मक सहकार्याने विकसित करण्यात आलीत.
वाघशीर : ही कलवरी श्रेणी प्रकल्प 75 अंतर्गत सहावी स्कॉर्पियन श्रेणीची पाणबुडी आहे. जगातील सर्वात शांत अन् डिझेल-इलेक्ट्रिक अशा दोन्ही इंधनांवर चालणारी ही पाणबुडी आहे. पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्त माहिती गोळा करणे, क्षेत्र निरीक्षण आणि विशेष मोहीम यांसह विविध मोहिमांमध्ये पाणबुडीची मोठी भूमिका राहणार आहे. या पाणबुडीमध्ये टॉर्पेडो, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रगत सोनार सिस्टीम असून, पाणबुडीमध्ये मॉड्युलर बांधकामदेखील आहे. यामुळे यात भविष्यात एयर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (AIP) तंत्रज्ञान यांसारख्या भविष्यातील सुधारणांचे एकत्रीकरण करता येणे शक्य होणार आहे.
हेलिकॉप्टर वाहतूक संदर्भातील अत्याधुनिक सुविधा : निलगिरी आणि सूरतमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्यात. त्यामध्ये हेलिकॉप्टर वाहतूक संदर्भातील अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्यात. चेतक, एएलएच, सी किंग आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या एमएच-60 आर यासह अनेक हेलिकॉप्टरचा यात समावेश आहे. या हेलिकॉप्टरद्वारे दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळा चालणाऱ्या मोहिमा राबवणे शक्य होणार आहे. रेल-लेस हेलिकॉप्टर ट्रॅव्हर्सिंग सिस्टीम तसेच व्हिज्युअल अँड आणि लँडिंग सिस्टीम यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये यात असल्याने कोणत्याही खडतर, प्रतिकूल परिस्थितीत मोहीम सुरू ठेवण्यासाठी त्यांचा मोठा सहभाग राहील.
महिला अधिकारी आणि खलाशांना संधी : जहाजांमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी महिला अधिकारी आणि महिला खलाशांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आलीय. आघाडीच्या लढाऊ भूमिकांमध्ये स्त्री-पुरुष भेद न करता समान संधी देण्याच्या नौदलाच्या प्रगतिशील भूमिकेला अनुसरून हा निर्णय घेण्यात आलाय. निलगिरी, सूरत आणि वाघशीरचे एकाच वेळी नौदलात सामील होणे हे संरक्षण, स्वावलंबन आणि स्वदेशी जहाजबांधणीमध्ये भारताची अतुलनीय प्रगती दर्शवणारे आहे. यंत्रसामग्री, हल, अग्निशमन आणि नुकसान, नियंत्रण मूल्यांकन, तसेच समुद्रातील सर्व नेव्हिगेशन आणि दळणवळण यंत्रणा सिद्ध करणे या सर्व बाबींच्या कठोर चाचण्या पूर्ण करून या युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यासाठी पूर्णतः सज्ज झाल्या आहेत. ही ऐतिहासिक घटना भारतीय नौदलाच्या लढाऊ क्षमतेला महत्त्वपूर्ण चालना देईल आणि स्वदेशी जहाजबांधणीमध्ये देशाची अग्रगण्य स्थिती अधोरेखित करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.
एकाच दिवशी दोन विनाशिका अन् एक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात; भारताची ताकद वाढणार - INDIAN NAVY FRONTLINE COMBATANTS
एकाच दिवशी दोन विनाशिका आणि एक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार असून, निलगिरी, सूरत या विनाशिका आणि वाघशीर पाणबुडी भारतीय नौदलात सामील होणार आहे.
भारतीय नौदलाची ताकद वाढणार (Source- ETV Bharat)
Published : Jan 3, 2025, 5:13 PM IST
|Updated : Jan 3, 2025, 6:45 PM IST
Last Updated : Jan 3, 2025, 6:45 PM IST