नवी दिल्ली :लोकगायिका तथा बिहार कोकिळा म्हणून ओळख असलेल्या पद्मभूषण शारदा सिन्हा यांचं मंगळवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. छठ उत्सवातील गाण्यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या पद्मभूषण गायिका शारदा सिन्हा यांचं ऐन छठ पर्वात निधन झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनानं बिहारच्या लोकसंगीताची मोठी हानी झाली आहे. शारदा सिन्हा यांच्या निधन झाल्यानं दिल्लीचे नायब राज्यपाल, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त केला आहे. आज लोक गायिका शारदा सिन्हा यांचं पार्थिव आज दुपारी पाटणा इथं आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
लोकसंगीतातील अमूल्य रत्न गमावलं :दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकगायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाप्रकरणी शोक व्यक्त केला. सोशल माध्यमांवर अरविंद केजरीवाल यांनी, "लोकगायिका शारदा सिन्हा यांच्या निधनानं लोकसंगीतानं एक अमूल्य रत्न गमावलं आहे. त्यांचा गोड आवाज आपल्या सगळ्यांमध्ये सदैव अमर राहील. छठ मैया त्यांच्या पुण्य आत्म्यास त्यांच्या चरणी स्थान आणि या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना धैर्य देवो. शारदा सिन्हा यांच्या गाण्याशिवाय छठचा सण अपूर्ण आहे, ओम शांती," अशा प्रकारे त्यांनी शोक व्यक्त केला.