नवी दिल्ली -भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा ( 76th republic day) केला जात आहे. दिल्लीत कर्तव्यपथावरील परेडमधून देशाच्या विविधतेमधील एकता, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि सैन्यदलाचं सामर्थ्य यांचं भव्य प्रदर्शन संपूर्ण जगाला पाहायला मिळणार आहे.
Live Updates
- प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि पिनाका मल्टी-लाँचर रॉकेट सिस्टीमचे प्रदर्शन करण्यात आले. कर्तव्यपथावर भारतीय हवाई दलाकडून प्रात्याक्षिके करण्यात आली आहेत.
- २०२५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची सुरुवात ३०० कलाकारांच्या समूहाच्या विविध वाद्यांच्या वादनानं झाली. सांस्कृतिक मंत्रालयाने वाद्यांचा हा गट एकत्र आणला आहे.
- ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ड्युटी स्टेशनवर राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर राष्ट्रगीत आणि २१ तोफांची सलामी देण्यात आली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा दिल्लीच्या कर्तव्य मार्गावर पोहोचला. येथे पोहोचताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचं स्वागत केले.
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले," भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारत हा लोकशाहीची जननी असलेला देश आहे. 'आत्मनिर्भर भारत' बनवणं, ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनविणं, 'विश्वगुरू' बनविणं हे पंतप्रधान मोदींचं ध्येय आहे. आपण सर्वांनी भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे".
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, आज आपण प्रजासत्ताकाचे गौरवशाली वर्ष साजरी करत आहोत. आपल्या संविधानाचे आदर्श जपण्यासाठी आणि मजबूत तसेच समृद्ध भारतासाठी काम करण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळकटी मिळो.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या नेतृत्व करणार आहेत. तर यंदा इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये लोकांचा सहभाग वाढवण्याच्या सरकारच्या उद्दिष्टानुसार सुमारे १०,००० खास पाहुण्यांना परेड पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणारे आणि केंद्र सरकारच्या योजनांचा सर्वोत्तम वापर करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शेतकऱ्यांचादेखील समावेश आहे.