नवी दिल्ली PM Narendra Modi Security : कोणत्याही देशासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे प्रमुख असतात आणि त्यांची सुरक्षा ही सर्वात मोठी जबाबदारी असते. सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास त्याचा देशावर भयानक परिणाम होऊ शकतो. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्यात गोळी ट्रम्प यांच्या कानाजवळून गेली. सध्या ट्रम्प सुरक्षित असले तरी यामुळं देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. आपल्या देशात पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी 'स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप' (SPG) कडं असली तरी पंतप्रधान दौऱ्यावर असताना मात्र त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य पोलिसांवरही असते. कशी असते भारताच्या पंतप्रधानांची सुरक्षा? किती स्तर आसतात? वाचा सविस्तर...
SPG अंगरक्षक : SPG अंगरक्षक हा देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेचा पहिला स्तर असतो. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी SPG म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपवर आहे. पंतप्रधानांच्या अंगरक्षकांना शौर्य चक्र, गुणवंत सेवेसाठी 43 राष्ट्रपती पोलिस पदकं आणि गुणवंत सेवेसाठी 323 पोलीस पदकं दिली जातात. पंतप्रधानांचे अंगरक्षक म्हणजेच SPG जवान FNF-2000 असॉल्ट रायफल, ऑटोमॅटिक गन आणि 17-M सारख्या काही धोकादायक पिस्तुल यांसारख्या अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असतात.
SPG कमांडो तैनात : देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात कमांडो SPG हे भारतातील सर्वात खास आणि विशेष दल आहे, जे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असते. यापूर्वी माजी पंतप्रधान आणि त्यांच्या निकटवर्तीयांनाही एसपीजीची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होती. पण दोन वर्षांपूर्वी SPG कायद्यात दुरुस्ती करण्यात आली, त्यानंतर केवळ विद्यमान पंतप्रधानांनाच ही सुरक्षा मिळते. SPG कमांडो दलात सामील होणं जितकं कठीण आहे तितकंच अवघड आहे. कारण खूप मोठं पद असण्यासोबतच ते एक अतिशय जबाबदारीचे काम देखील आहे. या दलात सामील होण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जातं, जे देशातील सर्वात कठीण प्रशिक्षणांपैकी एक आहे. SPG मध्ये सामील होणारे उमेदवार त्यापूर्वी स्पेशल फोर्समध्ये काम करत असणारे पाहिजेत. त्यानंतरही प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. हेच प्रशिक्षण युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस एजंटना दिलं जातं. एसपीजी कमांडो तंदुरुस्त, सतर्क आणि तंत्रज्ञान अनुकूल असतात. पंतप्रधानांची जबाबदारी असल्याने एसपीजींचा प्रत्येक कमांडर 'वन मॅन आर्मी' आहे.
NSG कमांडो :पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकाच्या छायाचित्रांमध्ये तुम्ही काळ्या कपड्यातील कमांडो हातात बंदूक घेऊन पाहिले असेल. भारताच्या पंतप्रधानांव्यतिरिक्त, ते प्रमुख केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि इतर व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेतही तैनात असतात. हे भारतातील सर्वात धोकादायक ‘ब्लॅक कॅट कमांडो’ आहेत. पंतप्रधान आणि व्हीव्हीआयपींच्या संरक्षणासोबतच हे कमांडो देशाच्या सुरक्षेसाठी कठीण परिस्थितीत किंवा दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी अनेक ऑपरेशन्स करतात. या दलात काही निवडक सैनिक आहेत, जे अत्यंत कठीण परिस्थितीतही लोकांचे प्राण वाचवतात. मुंबई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातही याच कमांडोंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. NSG कमांडो वरपासून खालपर्यंत काळ्या कपड्यांमध्ये झाकलेले असतात, म्हणून त्यांना 'ब्लॅक कॅट कमांडो' म्हणतात.
निमलष्करी दल : निमलष्करी दल भारताच्या सुरक्षा धोक्यांपासून बचावाचा पहिला स्तर म्हणून काम करतात. या दलांना सायबर युद्ध, तंत्रज्ञान, अंतर्गत युद्ध यांसारख्या नवीन प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, जेणेकरुन ते अशा कोणत्याही घटनेसाठी तयार राहू शकतात.
पंतप्रधानांचं सुरक्षा कवच कसं :
- SPG कमांडोचं सुरक्षा कवच चार स्तरांचं असतं. पहिल्या थरात पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी टीमवर असते. या टीममध्ये 24 कमांडो तैनात आहेत. या कमांडोकडे FNF-2000 असॉल्ट रायफल आहे. याशिवाय त्यांच्याकडे सेमी ऑटोमॅटिक पिस्तूल आणि इतर अत्याधुनिक शस्त्रे असतात.
- पंतप्रधान कुठंही प्रवास करताना बुलेट प्रूफ कारमधून प्रवास करतात. या ताफ्यात दोन चिलखती वाहनं धावतात. पंतप्रधानांच्या सोबत असलेल्या नऊ हायप्रोफाईल वाहनांमध्ये एक रुग्णवाहिका आणि जॅमर देखील आहे. या ताफ्यात एक डमी कारही धावते. त्या गाड्या आणि ताफ्यांमध्ये पंतप्रधानांसह सुमारे 100 सैनिकांचा समावेश आहे.
दररोज किती खर्च : पंतप्रधानांची सुरक्षा ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. यामुळंच SPG चं बजेट सातत्यानं वाढत आहे. 2014-15 मध्ये SPG चं बजेट 289 कोटी रुपये होते. जे 2015-16 मध्ये वाढवून 330 कोटी रुपये करण्यात आलं. 2019-20 मध्ये त्यांचं बजेट 540.16 कोटी रुपये करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही SPG संरक्षण मिळालं होतं. म्हणजेच या सर्वांच्या सुरक्षेचा खर्च पाहिला तर वर्षभरात 135 कोटी रुपये होतो. 2021-22 मध्ये SPG चं बजेट 429.05 कोटी रुपये होतं. आता फक्त पंतप्रधान मोदींना SPG सुरक्षा मिळते. म्हणजेच त्यांच्या सुरक्षेवर दररोज 1.17 कोटी रुपये खर्च होतात.