नवी दिल्ली :कुवेतचा दोन दिवसांचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रात्री उशिरा दिल्लीत पोहोचले. 43 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट होती. कुवेतचे अमीर शेख मेशाल अल यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी कुवेत दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदींनी कुवेतमधील अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि भारत-कुवेत संबंध अधिक दृढ करण्यासाठी कुवेतच्या राज्य प्रमुखांसोबत बैठक घेतली.
दोन्ही देशातील मैत्री अधिक घट्ट होईल : पंतप्रधान मोदींनी 'एक्स'वर पोस्ट करत आगामी काळात दोन्ही देशांतील मैत्री अधिक घट्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पीएम आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "कुवेतचे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्यासोबतची भेट खूपच छान होती. आम्ही फार्मास्युटिकल्स, आयटी, फिनटेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा यासांरख्या महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्यावर चर्चा केली. मला आशा आहे की, आगामी काळात दोन्ही देशातील मैत्री अधिक घट्ट होईल."
सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित : पंतप्रधान नरेंद्र मोदींना रविवारी (22 डिसेंबर) कुवेतचा सर्वोच्च सन्मान 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' देऊन सन्मानित करण्यात आलं. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांनी पंतप्रधान मोदींना 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलंय. पंतप्रधानांनी हा पुरस्कार भारत आणि कुवेत यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीला, कुवेतमधील भारतीय समुदायाला आणि भारतीय नागरिकांना समर्पित केलाय. हा पुरस्कार निवडक जागतिक नेत्यांना देण्यात येतो.
भारतीय समुदायाला संबोधित केलं : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवेत दौरा ऐतिहासिक आहे. कारण 43 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांची कुवेतची ही पहिलीच भेट आहे. आपल्या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी एका विशेष कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित केलंय.
हेही वाचा
- आता पॉपकॉर्नसाठीही द्यावा लागणार ५ ते १८ टक्के टॅक्स, काँग्रेसची सडकून टीका
- जीएसटी परिषदेचे प्रस्ताव मंजूर झाल्यास काय महाग-स्वस्त होणार? जाणून घ्या, सविस्तर
- चार मजली इमारत कोसळल्यानं तरुणीचा मृत्यू, एनडीआरएफकडून बचावमोहीम सुरू