रामनाथपुरम् (तामिळनाडू) PM Narendra Modi in Tamilnadu : अयोध्येत 22 जानेवारीला होणारा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देशात साजरा होतोय. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. यासाठी ते काटेकोरपणे पालनही करत आहेत. याआधी ते दक्षिण भारतातील मंदिरांना भेट देऊन प्रार्थना करत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आज 'रामसेतू'च्या मूळ ठिकाणी भेट देणार आहेत.
- सकाळी 'रामसेतू'च्या जागी देणार भेट : पंतप्रधान मोदी आज सकाळी 9.30 वाजता अरिचल मुनई पॉईंटला भेट देतील. या ठिकाणी 'रामसेतू' बांधला होता असं म्हटलं जातं. यानंतर ते सकाळी 10.15 वाजता श्री कोठंडाराम स्वामी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. कोठंडाराम नावाचा अर्थ धनुष्य असलेला राम आहे. हे ठिकाण धनुषकोडी इथं आहे.
काय आहे या जागेचं महत्त्व? : धनुषकोडी बद्दल असं म्हटलं जातं की इथंच बिभीषणानं श्रीरामांची पहिल्यांदा भेट घेतली. त्यांच्याकडं आश्रय मागितला. तसंच जिथं श्रीरामांनी विभीषणाचा राज्याभिषेक केला होता, हे तेच ठिकाण असल्याचाही काही आख्यायिकांमध्ये उल्लेख आहे. शनिवारी पंतप्रधान मोदींनी भगवान रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली. तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील रामेश्वरम बेटावर असलेल्या शिव मंदिराचा रामायणाशी संबंध आहे. कारण या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाची स्थापना भगवान श्रीरामांनी केली होती. यानंतर श्रीरामांनी इथं माता सीतेसोबत प्रार्थना केली होती, असं म्हटलं जातं. रंगनाथनस्वामी मंदिराला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.