हैदराबाद Phone Tapping Case : विरोधकांचे फोन टॅप केल्याच्या प्रकरणात तेलंगाणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस महानिरीक्षक आणि नंतर ओएसडी म्हणून कार्य केलेले प्रभाकर राव यांनी फोन टॅप करण्यासाठी विशेष पथक स्थापन केल्याचं त्यांच्या चौकशीत उघड झालं आहे. तत्कालिन विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षातील असंतुष्ट नेत्यांची हेरगिरी करण्याची जबाबदारी निलंबित पोलीस अधीक्षक प्रणित राव यांच्यावर सोपवण्यात आल्याचंही या चौकशीत समोर आलं आहे.
हैदराबाद टास्क फोर्सचे पोलीस अधीक्षक अटकेत :पोलीस महानिरीक्षक आणि ओएसडी म्हणून काम केलेल्या प्रभाकर राव यांच्या निर्देशानुसार विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. हे पथक विरोधकांचे फोन टॅप करत होतं, असंही तपासात उघड झालं आहे. या पथकाची जबाबदारी निलंबित पोलीस अधीक्षक प्रणित राव यांच्यावर सोपवण्यात आली होती. प्रणित राव यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षांचे पैसे जप्त करण्यात आले होते. हैदराबाद टास्क फोर्सचे पोलीस अधीक्षक आणि ओेसडी राधाकिशन राव यांच्या तपासात अनेक गंभीर बाबींचा खुलासा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष पथकात या अधिकाऱ्यांचा होता समावेश :तत्कालिन टीआरएस आणि आताचा बीआरएस हा पक्ष 2014 मध्ये पहिल्यांदा सत्तेवर आला. त्यानंतर प्रभाकर राव यांची 2016 मध्ये गुप्तचर विभागात बदली करण्यात आली. प्रभाकर राव यांनी त्यांच्यासोबत काम केलेल्या अगोदरच्या अधिकाऱ्यांना विविध विभागात नियुक्त केलं. यात नालगोंडा जिल्ह्यातील प्रणीत राव, राचकोंडा आयुक्तालयातील भुजंग राव, सायबराबाद येथील वेणुगोपाल राव, हैदराबाद आयुक्तालयातील थिरुपतन्ना आदींचा समावेश होता. या अधिकाऱ्यांची एक 'स्पेशल ऑपरेशन टीम' तयार करण्यात आली. या पथकाचं नेतृत्व प्रणित राव यांच्यावर सोपवण्यात आलं. विरोधी पक्षांचे नेते, त्यांचे समर्थक, पक्षातील बंडखोरांवर लक्ष ठेवणं हा या पथकाच्या स्थापनेचा उद्देश होता. मात्र हे एसआयबी धोरणांच्या पूर्णपणे विरोधात आहे.
राधाकिशन राव यांनी तपासात दिली 'ही' कबुली :फोन टॅप प्रकरण पुढं आल्यानंतर राधाकिशन राव यांना अटक करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी प्रभाकर राव यांच्या सूचनेनुसार हैदराबाद शहरातील राजकीय नेत्यांवर वर्चस्व राखण्यासाठी बीआरएसनं त्यांना टास्क फोर्सचं पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार गट्टुमल्लू यांची पश्चिम मंडळाचे परिक्षेत्र निरीक्षक ( CI ) म्हणून नियुक्त केलं होतं. दोन वर्ष तिथं काम केल्यानंतर गट्टुमल्लू यांना प्रभाकर राव यांच्या सूचनेनुसार एसआयबीमध्ये घेतलं, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊतांना कुलाबा पोलीस स्टेशनचे समन्स
- Pankaj Dahane Inquiry : फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची चौकशी
- Phone tapping: पेगासस स्पायवेअरद्वारे नेते, मंत्री आणि पत्रकारांचे फोन टॅप, वाचा संपूर्ण प्रकरण