नवी दिल्ली: महाकुंभ मेळाव्यातील चेंगराचेंगरीच्या (New Delhi railway station stampede) दुर्घटनेनंतर नवी दिल्लीतही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्यानं चेंगराचेंगरी झाली. या अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १२ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. १६ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी असल्यानं हा अपघात झाला असून केंद्रानं चौकशीचे आदेश दिले आहेत.
शनिवारी रात्री ९ वाजून ५५ मिनिटाला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेतील जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले आहे. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या पाठविण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी मदतकार्य केलं. प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेल्वे अचानक रद्द झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना आणि दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी रात्री उशिरा एलएनजेपी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
कशी घडली दुर्घटना-दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, " १५ जणांना मृतावस्थेत आणण्यात आलं. ही खूप दुःखद घटना आहे. आमचे दोन आमदार येथे आहेत. कोणत्याही पीडितच्या कुटुंबाला कसल्याही प्रकारची मदत हवी असेल तर त्यांनी आपच्या आमदारांना कळवावे, असे रुग्णालय प्रशासनाला सांगितलं. १५ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ४-५ रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. दोन मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही." डीसीपी रेल्वे केपीएस मल्होत्रा यांच्या माहितीनुसार दोन रेल्वेला उशीर झाल्यामुळे आणि प्रवाशांची संख्या जास्त असल्यानं रेल्वे स्थानकावर खूप गर्दी होती. १५-२० मिनिटांच्या कालावधीत प्रचंड गर्दीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. स्पेशल रेल्वेची घोषणा झाल्यानंतर रेल्वेत जाण्याकरिता प्रवाशांनी गर्दी केल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे.