अयोध्या Monkey In Ram Mandir : 22 जानेवारीचा दिवस संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक होता. या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या कार्यक्रमाला देश-विदेशातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली. प्राणप्रतिष्ठेनंतर आता मंदिराचे दरवाजे सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक मंदिरात येत आहेत. दरम्यान, मंगळवारी 23 जानेवारीला एक अनोखी घटना घडली, जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.
काय घडलं : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्रानं सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे या घटनेची माहिती दिली. पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "आज संध्याकाळी 5:50 च्या सुमारास एक माकड दक्षिणेकडील दरवाजातून गर्भगृहात शिरलं. हे माकड सरळ रामाच्या मूर्तीजवळ पोहोचलं. बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना जेव्हा हे माकड दिसलं, तेव्हा या माकडामुळे मूर्तीला इजा होऊ शकते असा विचार करून ते माकडाच्या दिशेने धावले. मात्र सुरक्षा रक्षक धावून येताच माकड शांतपणे उत्तरेकडील दरवाजाकडं गेलं. मात्र गेट बंद असल्यानं ते पूर्वेकडे वळालं आणि भाविकांना कुठलाही त्रास न देता त्यांच्या समोरून पूर्वेकडील दरवाजातून बाहेर पडलं".