नवी दिल्लीNew Chief Minister of Odisha : ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपाचं सरकार स्थापन झालं आहे. 52 वर्षीय मोहन चरण माझी यांनी बुधवारी राज्याचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री कनकवर्धन सिंगदेव (67) तसंच प्रभावती परिदा (57) यांनीही शपथ घेतली. माझी मंत्रिमंडळातील 13 मंत्र्यांनीही यावेळी शपथ घेतली. यामध्ये सुरेश पुजारी, रबीनारायण नाईक, नित्यानंद गोंड, कृष्ण चंद्र पत्रा, पृथ्वीराज हरिचंदन, मुकेश महालिंग, बिभूती भूषण जेना, कृष्ण चंद्र महापात्रा, गणेश रामसिंग खुंटिया, सूर्यवंशी सूरज, प्रदीप बलसामंता, गोकुळा नंद मल्लिक तसंच संपद कुमार स्वेन यांचा समावेश आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, अमित शाह, उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आसाम, हरियाणा, गोवा तसंच उत्तराखंडचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
24 वर्षांनंतर ओडिशात आदिवासी मुख्यमंत्री :24 वर्षांनंतर ओडिशाला आदिवासी मुख्यमंत्री मिळालाय. यापूर्वी काँग्रेसचे हेमानंद बिस्वाल हे राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री होते. बिस्वाल 1989-1990 तसंच 1999-2000 असे दोन वेळा मुख्यमंत्री होते. राज्याचे दुसरे आदिवासी मुख्यमंत्री गिरीधर गमांग होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ खूपच कमी होता. बिस्वाल यांच्यानंतर येथे काँग्रेस कधीच सत्ता आली नाही.
भाजपानं जिंकल्या 78 जागा : यावेळी ओडिशा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं बिजू जनता दलाचा विजयरथ रोखत मोठा विजय नोंदवलाय. भारतीय जनता पक्ष 147 पैकी 78 जागा जिंकून ओडिशातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. पक्षानं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. दुसरीकडं बिजू जनता दलानं 51 जागा जिंकल्या आहेत.