श्रीनगर : घराला लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना जम्मू काश्मीरच्या कठुआ इथल्या शिवनगर परिसरात घडली. हे सहा नागरिक रात्री झोपल्यानंतर आग लागल्यामुळे त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला असावा, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी असलेल्या नागरिकांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आता जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
घराला आग लागून सहा जणांचा मृत्यू :कठुआ इथल्या शिवनगर परिसरात निवृत्त मेट्रॉनचं घर आहे. या घराला लागलेल्या भीषण आगीत 6 नागरिकांचा मृत्यू झाला. तर 4 जण गंभीर झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत कठुआ जीएमसीचे प्रमुख एस के अत्री यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की "निवृत्त सहायक मेट्रॉन या घरात भाड्यानं राहात होते. यावेळी रात्री घराला भीषण आग लागली. या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले. या सहा नागरिकांचा गुदमरुन मृत्यू झाला, असं प्राथमिकरित्या दिसून येते आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत," असं त्यांनी यावेळी सांगितलं.