नवी दिल्ली-माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारकडून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या वर्षी एप्रिलमध्ये मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे.
राष्ट्रीय दुखवट्याच्या दिवशी संपूर्ण देशात राष्ट्रीय ध्वज हा सर्व इमारतींवर अर्ध्यावर फडकला जाईल. राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात सरकारकडून कोणतेही अधिकृतपणे मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारनं आजचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे.
पंतप्रधान पदासह केंद्रीय अर्थमंत्री म्हणून मोलाची कामगिरी-मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 पर्यंत देशाचे पंतप्रधान म्हणून कार्य करताना सर्व शिक्षा अभियान, वनाधिकार कायदा यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या उदारीकरणाच्या निर्णयामुळे 1990 नंतरच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. पी.व्ही. यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देशाचे अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेत व्यापक सुधारणा घडवून आणल्यानं भारतानं अर्थव्यवस्थेत भरारी घेतली.
शेड्यूल अद्याप निश्चित झालेले नाही. त्यांची मुलगी परदेशातून येत आहे. ती दुपार आणि संध्याकाळपर्यंत पोहोचेल. त्यानंतर सर्व काही ठरवले जाईल. उद्या अंतिमसंस्कार होऊ शकतात- काँग्रेस नेते, संदीप दीक्षित
शनिवारी पार्थिवावर होणार अंतिमसंस्कार-"माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी अंतिमसंस्कार होणार आहेत. आम्ही अधिकृतपणे घोषणा करणार आहोत," असे काँग्रेसचे सरचिटणीस काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी उशिरा रात्री दिल्लीत माध्यमांना सांगितले. डॉ. मनमोहन हे एम्समध्ये नेण्याआधी घरी अचानक बेशुद्ध पडले होते. एम्सच्या माहितीनुसार मनमोहन सिंग यांना एम्समध्ये रात्री 8 वाजून 6 मिनिटाला दाखल करण्यात आले. रात्री 9 वाजून 51 मिनिटाला त्यांना मृत घोषित करण्यात आले.
काँग्रेस स्थापनेचे सर्व कार्यक्रम रद्द-28 डिसेंबर रोजी काँग्रेसचा स्थापना दिन आहे. या दिवशीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डॉ.मनमोहन सिंग यांचे पार्थिव गुरुवारी रात्री उशिरा एम्समधून त्यांच्या ३ मोतीलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानी पोहोचले. त्यांचे पार्थिव अंतिमदर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार प्रियांका गांधी वड्रा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी डॉ. सिंग यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा भेट दिली.
हेही वाचा-