राज्यसभेतून विरोधकांनी सभागृहत्याग केला. त्यावर राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "मल्लिकार्जुन खरगे घटनात्मक पदावर आहेत. पंतप्रधान असो किंवा सभागृहाचे अध्यक्ष, त्यांनी विरोधी पक्षनेत्याचा आदर करणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण, त्या सर्वांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे संपूर्ण विरोधक मल्लिकार्जुन यांच्याशी पाठीशी आहेत. त्यामुळे आम्ही सभागृहत्याग केला."
मल्लिकार्जुन खरगे घटनात्मक पदावर, त्यांचा आदर करणे हे पंतप्रधानांची जबाबदारी-शरद पवार - Maharashtra breaking News - MAHARASHTRA BREAKING NEWS
Published : Jul 3, 2024, 7:35 AM IST
|Updated : Jul 3, 2024, 1:45 PM IST
राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते.
LIVE FEED
मल्लिकार्जुन खरगे घटनात्मक पदावर, त्यांचा आदर करणे हे पंतप्रधानांची जबाबदारी-शरद पवार
पंतप्रधान मोदींना खोटे बोलण्याची सवय-मल्लिकार्जुन खर्गे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेत भाषण सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला. यावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, " पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहाला संबोधित करताना काही चुकीच्या गोष्टी सभागृहाला सांगितल्या होत्या. त्यांना खोटं बोलण्याची सवय आहे. त्यांनी (RSS) संविधानाला विरोध केला आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरूंचा पुतळा जाळला होता."
राहुल गांधींच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपा नेत्यांची काँग्रेस मुख्यालयासमोर निदर्शने
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंवर केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ झाला आहे. भाजपाकडून काँग्रेसची कोंडी करण्याकरिता थेट दिल्लीतील मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी पोलिसांनी भाजपाचे नेते वीरेंद्र सचदेवा आणि कर्नाटकचे खासदार तेजस्वी सूर्या यांना ताब्यात घेतले. भाजपाच्या आंदोलनात नवी दिल्लीच्या खासदार बन्सुरी स्वराज यादेखील सहभागी झाल्या.
अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेईपर्यंत आम्ही खाली बसू, बोलणार नाही- अनिल परब
विधानपरिषद सभागृहात विरोधी पक्षाच्या आमदारांनी अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे. विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे सभागृहात काम करण्याची आमची इच्छा होत नाही. त्यांचे निलंबन रद्द होईपर्यंत, आम्ही तोपर्यंत आम्ही खाली बसू, बोलणार नाही, अशी भूमिका अनिल परब यांनी घेतली. त्यावर विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी "प्रश्न उत्तर होऊ द्या. त्यानंतर आपण काही मार्ग काढता येईल का ते बघू," असे आश्वासन दिले.
संविधानाचा राष्ट्रव्यापी उत्सव साजरा करणार-पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, " देशाची अर्थव्यवस्था वेगानं प्रगती करत आहे. संविधानाचा राष्ट्रव्यापी उत्सव साजरा करणार आहोत. विरोधी पक्षांनी संविधान दिना विरोध केला." या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी सभागृहात गोंधळ केला. विरोधकांच्या गोंधळातच पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू आहे. पंतप्रधान म्हणाले, " विरोधकांना काहीही करायचे नाही. त्यांना फक्त वाट पाहणे माहित आहे. आमचा कठोर परिश्रमावर विश्वास आहे. येणाऱ्या ५ वर्षात गरिबीच्या विरोधात लढणार आहोत. पुढील ५ वर्षांमध्ये मुलभूत सुविधांवर अधिक भर देणार आहोत. भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणू."
जनतेनं तिसऱ्यांदा जनादेश दिला, पण काही लोकांना जनादेश समजला नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, " जनतेनं तिसऱ्यांदा जनादेश दिला आहे. विरोधकांना पराभव स्वीकारावा लागला आहे. काही लोकांना जनादेश समजला नाही. संभ्रमाच्या राजकारणाला जनतेनं नाकारलं आहे. देशाच्या जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवित आशीर्वाद दिला."
40% कमिशन खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो..विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकाकडून आंदोलन करण्यात आले. स्मार्ट मीटर कुणासाठी अदानीच्या फायद्यासाठी, 40% कमिशन खाणाऱ्या सरकारचा धिक्कार, खोके सरकार हाय हाय आणि शेतकरी उपाशी सरकार तुपाशी, अशी विरोधकांनी घोषणाबाजी केली.
NEET परीक्षा बंद करा-अभिनेता विजय
TVK चे प्रमुख आणि अभिनेता विजय यांनी NEET परीक्षा बंद करण्याची मागणी केली. अभिनेता विजय म्हणाले, "लोकांना NEET परीक्षेवर विश्वास नाही. देशाला NEET ची गरज नाही. NEET ला वगळणं हा एकमेव उपाय आहे. NEET विरुद्धच्या ठरावाचे मी मनापासून स्वागत करतो. तामिळनाडूच्या लोकांच्या भावनांचा आदर करावा, अशी केंद्र सरकारला विनंती आहे."
संसदेत बोलू दिलं नाही, माझा माईक बंद केला-संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बालबुद्धी म्हटले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. खासदार राऊत म्हणाले, " याच नेत्यामुळे मोदींना लोकसभेत घाम फुटला. मोदी संविधान मानायला तयार नाहीत. मला संसदेत बोलू दिलं नाही. माझा माईक बंद केला."
हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटना प्रकरणात दाखल, भोले बाबा नव्हे सत्संग आयोजकांवर एफआयआर
हाथरसमधील भाविकांच्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांचे मृत्यू झाले आहेत. या प्रकरणी देवप्रकाश मधुकर या 'मुख्य सेवादार'वर गुन्हा दाखल झाला. भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 105, 110, 126(2), 223 आणि 238 अंतर्गत एफआयआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आयोजकानं प्रशासनाकडे सुमारे 80,000 लोकांसाठी परवानगी मागितली होती. प्रशासनाने त्यानुसार वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था केली. मात्र, 'सत्संग'मध्ये सुमारे अडीच लाख लोक जमल्यानं दुर्घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे.
चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 116 वरून 121, सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल
हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 116 वरून 121 झाली आहे. तर 28 जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची सीबीआय चौकशी करावी, अशी जनहित याचिका वकील गौरव द्विवेदी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली. समाजवादी पक्षाचे माजी खासदार डॉ. एस.टी. हसन म्हणाले, "ही दुर्दैवी घटना असून मृतांमध्ये बहुतांश गरीब कुटुंबातील होते. ही प्रशासकीय चूक आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे."
दीक्षाभूमी येथे तोडफोड आणि जाळपोळ केल्यानं १५ जणांवर गुन्हा दाखल, आरोपींमध्ये वंचितच्या शहर अध्यक्षांचाही समावेश
नागपूर- दीक्षाभूमी येथे १ जुलै रोजी घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्षसह विविध सामाजिक संघटनांच्या एकूण १५ ज्ञात आणि इतर अनेक अज्ञात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीक्षाभूमीवर झालेले हिंसक आंदोलन आणि बांधकाम साहित्याची तोडफोड तसेच आग लावल्याच्या घटनेबद्दल नागपूर पोलिसांनी बजाज नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यात वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांचाही समावेश आहे. याशिवाय इतर अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
इस्रायलनं राफाहमधील एकूण 900 दहशतवाद्यांना केले ठार
जेरुसलेम- हमासबरोबर इस्रायलचा मे पासून युद्धसंघर्ष सुरू आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून इस्रायलनं गाझाच्या दक्षिणेकडील शहर रफाहमध्ये सुमारे 900 दहशतवाद्यांना ठार केल्याचे इस्रायलचे सैन्यदलप्रमुख हर्झी हालेवी यांनी सांगितले.
दिल्लीत शरद पवार-राहुल गांधींची भेट, काय झाली चर्चा?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्रातील काही विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी मजबूत करण्याबाबत चर्चा केली. ही भेट संसद भवन परिसरात झाली. सूत्राच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मजबूत करण्याबरोबरच राज्यातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
‘लाडली बहीण’ योजना राबविण्याकरिता महिलांचे डिजीटल रेकॉर्ड तयार करण्यात येणार
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुती सरकारनं महिला मतदारांना डोळ्यांसमोर ठेवून 'लाडकी बहीण' योजना लागू केली. ही योजना लवकरात लवकर लागू करण्याची राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले की, "या योजनेसाठी सरकारतर्फे सर्वप्रथम महिलांच्या डिजिटल रेकॉर्डचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. निवडणुकीपूर्वी महिलांना 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येईल."