नवी दिल्ली Lok Sabha Session 2024 : लोकसभा अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. यावेळी शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या शपथविधीला ठाकरे गटानं विरोध केला. तर निलेश लंकेंनी इंग्रजीतून खासदार पदाची शपथ घेतली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी उपसभापती पद देण्याची मागणी केली. उपसभापती पद दिल्यास सत्ताधाऱ्यांना पाठींबा देऊ, अशी अट राहुल गांधी यांनी ठेवली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा फोन आल्यानंतर राहुल गांधी यांनी ही अट ठेवली. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांना राजनाथ सिंग यांचा फोन :लोकसभा सभापती पदासाठी विरोधकांनी पाठींबा द्यावा, यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कॉल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राहुल गांधी यांनी विरोधकांचा पाठींबा हवा असल्यास आम्हाला उपसभापती पद द्या, अशी अट ठेवली. त्यांच्या या अटीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.