लखनऊ PM Narendra Modi Nomination : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. पाचव्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीची तयारी आता सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पुष्य नक्षत्रावर 11 वाजता काशी विश्वेश्वरांचं दर्शन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे आज गंगा सप्तमीचं पर्व आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेला दशाश्वमेध घाटावर जाऊन गंगेला नमन केलं. त्यानंतर ते कालभैरव मंदिरात दर्शनासाठी गेले.
पंतप्रधानांनी गंगा पूजन करुन केली कालभैरव अष्टकाची पूजा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा वाराणसीतील बनारस लोकोमोटिव्ह वर्कशॉप गेस्ट हाऊस इथून सकाळी साडेआठ वाजता निघाला. त्यानंतर त्यांचा ताफा गंगा पूजा करण्यासाठी दशाश्ववमेध घाटावर पोहोचला. इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधीनुसार गंगा मातेची पूजा केली. गंगा पूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कालभैरव मंदिराकडं रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालभैरव मंदिरात भैरव अष्टकाची पूजा केली. बाबा कालभैरवची आरती झाल्यानंतर त्यांनी नामांकन अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकांची उपस्थिती होती.