नवी दिल्ली/अकोला Kulgam Encounter Updates: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी (6 जुलै) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवानांना आलं. तर यावेळी सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांना ठार केलं. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली. त्यानंतर दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे दोन जवान हुतात्मा झाले. यामध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ या जवानाचा देखील समावेश आहे. प्रवीण जंजाळ यांना वीरमरण आल्याची माहिती मिळताच त्यांच्या मोरगाव भाकरे या गावावर शोककळा पसरली.
डोक्याला गोळी लागल्यानं मृत्यू : प्रवीण जंजाळ हे सेकंड महार रेजिमेंटमध्ये 2020 ला भरती झाले होते. गेल्या चार महिन्यांपासून ते कुलगामा येथे क्रमांक एकच्या तुकडीत आपलं कर्तव्य बजावत होते. या तुकडीसोबतच शनिवारी मोडरगाम येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकमध्ये त्यांना वीरमरण आलं. चार दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. यावेळी प्रवीण जंजाळ यांच्या डोक्याला गोळी लागल्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेजिमेंटकडून कुटुंबीयांना देण्यात आली. रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी मोरगाव भाकरे येथील सरपंच उमा माळी यांच्याशी संपर्क साधून प्रवीण यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण यांचं चार महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं.
- गावामध्ये पसरली शोककळा : प्रवीण जंजाळ यांच्या निधनाची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी आणि प्रवीणच्या मित्रांनी त्याच्या घरी एकच गर्दी केली. मित्रांनी रात्रभर त्यांच्या घरी राहून त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. हुतात्मा प्रवीण यांच्या पार्थिवावर परवा अंत्यसंस्कार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.