हैदराबाद August Kranti Din 2024 :9 ऑगस्ट हा 'ऑगस्ट क्रांती दिन' म्हणून साजरा केला जातो. 8 ऑगस्ट 1942 महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर 9 ऑगस्ट हा दिवस 'क्रांती दिन' म्हणून पाळण्यात आला. या आंदोलनाने ब्रिटीश साम्राज्याला हादरा बसला होता. ऑगस्टमध्ये हे आंदोलन सुरू झाल्यानं त्याला 'ऑगस्ट चळवळ' किंवा 'ऑगस्ट क्रांती' असंही म्हटलं जातं. भारतातील ब्रिटिश शासन संपवण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली होती.
मुंबईतील ‘गोवालिया टँक’ मैदान :9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या 'गोवालिया टँक' येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महाअधिवेशन भरले होते. या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनातून ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील ‘गोवालीया टँक’ म्हणजे आजच्या ‘ऑगस्ट क्रांती मैदाना’तून झाली. त्यानंतर या आंदोलनाचा भडका संपूर्ण देशभरात पसरला होता. या आंदोलनादरम्यान, महात्मा गांधींनी भारतीयांना 'करेंगे या मरेंगे' असा नारा दिला होता. या चळवळीदरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली. अशा अमर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून आजचा दिवस साजरा केला जातो.
सविनय कायदेभंग चळवळ : 8 ऑगस्ट 1942 रोजी बॉम्बे अधिवेशनाने भारत छोडो आंदोलनाची पायाभरणी केली. भारत छोडो आंदोलन ऑगस्टमध्ये सुरू झाले, म्हणूनच याला 'ऑगस्ट आंदोलन' असंही म्हणतात. भारतातील ब्रिटीश राजवट संपवण्यासाठी सुरू केलेली ही सविनय कायदेभंग चळवळ होती. गांधीजींनी आपल्या भाषणात देशाला 'करो किंवा मरो' असं आवाहन केलं होतं. ही चळवळ 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाली. यानंतर इंग्रजांनी सूडबुद्धीनं महात्मा गांधींसह सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली.