अयोध्या : काही महिन्यांपूर्वी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली होती. या धमकी प्रकरणाचा एक ऑडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राम मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळं राम मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
कोणी दिली धमकी? : खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिस प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यानं एक व्हिडिओ जारी करून ही धमकी दिली आहे. या व्हिडिओत 16 आणि 17 नोव्हेंबरला राम मंदिरात हिंसाचार होणार असल्याचं सांगण्यात आलंय. तसंच हिंदुत्वाच्या विचारसरणीचं ठिकाण असलेल्या अयोध्येला आम्ही हादरवून टाकू, असंही व्हिडिओत म्हटलंय. पन्नूनं जारी केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही राम मंदिरात पूजा करताना दिसत आहेत. या धमकीनंतर रामजन्मभूमी परिसर हाय अलर्टवर आहे.
राम मंदिराच्या सुरक्षेत वाढ : या संदर्भात अधिक माहिती देत अयोध्याचे सीओ आशुतोष तिवारी म्हणाले, "व्हिडिओ रिलीज झालाय, त्याचा अभ्यास आम्ही करतोय. अयोध्या आणि श्री रामजन्मभूमीची सुरक्षा वाढवण्यात आली असून अलर्ट घोषित करण्यात आलाय." तर आयजी प्रवीण कुमार यांनी सांगितलं, "व्हिडिओच्या माध्यमातून दहशतवादी पन्नूकडून धमकी मिळाली आहे. यापूर्वीही राम मंदिराला अशा धमक्या मिळाल्या आहेत. आम्ही पुन्हा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतोय,". तर यापूर्वी 22 ऑगस्टलाही अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या हेल्प डेस्क मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे ही धमकी देण्यात आली होती. मंदिर लवकरच नष्ट होईल, असं त्यात लिहिलं होतं. या धमकीनंतर यूपी एटीएसनं 14 सप्टेंबर रोजी बिहारमधील भागलपूर येथून आरोपी मोहम्मद मकसूदला अटक केली होती.
हेही वाचा -
- विमान कंपन्या आणि रेल्वेला स्फोटाची धमकी देणारा जगदीश उईके पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरू
- 'सलमान खान-लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्याला महिनाभरात मारलं जाईल', अभिनेत्याला आणखी एक धमकी
- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला मिळाली धमकी, मुंबई पोलिसांनी रायपूरच्या वकिलाला केली अटक