नवी दिल्ली : न्यायाधीश संजीव खन्ना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. यावेळी कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी सरन्यायाधीश खन्ना यांचे अभिनंदन केले. शपथविधी सोहळ्याला माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड उपस्थित राहीले.
धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश पदावरून रविवारी निवृत्त झाले. त्यांची जागा न्यायाधीश संजीव खन्ना यांनी घेतली आहे. सरन्यायाधीश खन्ना यांचा सरन्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा म्हणजे 13 मे 2025 पर्यंत कार्यकाळ राहणार आहे. केंद्र सरकारनं न्यायाधीश संजीव खन्ना यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी नुकतीच अधिसूचना जारी केली होती. कायदा आणि न्याय मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटलं की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 च्या कलम (2) अंतर्गत राष्ट्रपतींनी न्यायाधीश खन्ना यांची देशातील सर्वोच्च न्यायिक पदावर नियुक्ती केली आहे.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याविषयी-14 मे 1960 रोजी जन्मलेल्या सरन्यायाधीश खन्ना यांनी 1983 मध्ये कायदे क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली. खन्ना यांनी प्रथम दिल्ली बार काउन्सीलमध्ये वकिलीला सुरुवात केली. घटनात्मक कायदा, कर, लवाद, व्यावसायिक कायदा आणि पर्यावरण कायदा यासह कायदेशीर क्षेत्रात त्यांना मोठा अनुभव आहे. सरन्यायाधीश खन्ना यांनी प्राप्तिकर विभागाकरिता वकील म्हणूनही काम केले आहे. सरन्यायाधीश खन्ना हे दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश देव राज खन्ना यांचे पुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एच.आर. खन्ना यांचा पुतणे आहेत.
सरन्यायाधीश होण्यापूर्वी संजीव खन्ना यांनी या खटल्यासंदर्भात दिलेत निकाल
- न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना खन्ना यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता.
- जम्मू काश्मीरचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला होता. या खंडपीठात न्यायाधीश खन्ना होते.
- 2018 च्या इलेक्टोरल बाँड योजनेवरून सरकारला फटकारण्यात आले होते. या खंडपीठातही न्यायाधीश खन्ना होते.
नवे सरन्यायाशीध खन्ना यांचे कौतुक-मावळते सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी निरोपाच्या कार्यक्रमात भावूक भाषण केले. यावेळी त्यांनी रांगेत बसलेला कायद्याचा विद्यार्थी होण्यापासून ते सरन्यायाधीश होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. त्यांनी न्यायाधीश संजीव खन्ना यांचे कौतुक केले. यावेळी धनंजय चंद्रचुड म्हणाले, " न्यायाधीश खन्ना हे खूप स्थिर आणि न्यायासाठी खूप वचनबद्ध आहेत. त्यामुळे आनंदाच्या भावनेनं मी न्यायालयातून बाहेर पडत आहे. सोमवारी येथे येऊन बसणारी व्यक्ती अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आहे. ते व्यापक पातळीवर जागरूक आहेत."
असामान्य वडिलांचे असामान्य पुत्र -यावेळी न्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले, "मला न्यायाधीश चंद्रचूड यांच्या न्यायालयात हजर राहण्याची संधी मिळाली नाही. परंतु त्यांनी केलेल्या कामाचा मला अभिमान आहे. पुढे न्यायाधीश खन्ना म्हणाले की, " सरन्यायाधीश चंद्रचूड यांना समोसे आवडतात. जवळपास प्रत्येक बैठकीत त्यांना समोसे दिले जातात". दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, "सरन्यायाधीशांची उणीव भासणार आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले, "तुम्ही एका असामान्य वडिलांचे असामान्य पुत्र आहात. नेहमी हसतमुख असणारे डॉ. चंद्रचूड, तुमचा चेहरा सदैव आठवणीत राहील."
हेही वाचा-
- "अयोध्येचा निकाल देण्यापूर्वी देवासमोर बसून...", सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितली इनसाइड स्टोरी
- कोण आहेत न्यायाधीश संजीव खन्ना ? सरन्यायाधीश पदी नियुक्ती होण्याची शक्यता