रांचीJharkhand News CM :झारखंडमध्ये नवीन सरकार स्थापन कधी होणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी सांयकाळी पुन्हा एकदा राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांना 43 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय. राज्यपालांकडून सरकार स्थापनेबाबत काहीही अधिकृत माहिती आलेली नाहीय. नवं सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पक्षाकडून 43 आमदारांचा व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंपाई सोरेन म्हणाले, सुमारे 22 तास उलटले आहेत. परंतु नवीन सरकारच्या शपथविधीबाबत राज्यपालांनी काहीही सांगितलेलं नाही.
43 आमदारांचा पाठिंबा :महाआघाडी विधिमंडळ पक्षाच्या नेते चंपाई सोरेन यांनी राज्यपालांना पत्र लिहून दुपारी ३ वाजता राजभवनात भेटीची वेळ मागितली होती. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सायंकाळी साडेपाच वाजता बैठकीची वेळ दिली आहे. मात्र, त्यांनी केवळ 5 नेत्यांना भेटण्याची संधी दिली आहे. सोरेन यांनी बहुमताची हमी देण्यासाठी आमदारांना भेटण्यासाठी वेळ मागितली. राज्यात तब्बल 18 तास सरकार नसल्यानं गोंधळाची परिस्थिती आहे. आम्हाला 43 आमदारांचा पाठिंबा असून स्वाक्षऱ्यांचं पत्रं सादर राज्यपालांना पाठवल्याचं सोरेन यांनी सांगितलं.