नवी दिल्ली Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. निर्मला सीतारामन यांनी नागरिकांसाठी रुफटॉप सोलरायझेशन योजनेचा उल्लेख केला आहे. त्याला प्रधानमंत्री सूर्योदय योजना असंही म्हटलं जातं. या योजनेद्वारे एक कोटी घरांमध्ये सौरऊर्जा सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नागरिकांची तब्बल 300 युनिट विजेची बचत होणार आहे.
नागरिकांना 300 युनिट मोफत वीज :आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुफटॉप सोलर सिस्टीम बसवण्यासाठी योजना जाहीर केली आहे. या योजनेत रुफटॉप सोलर सिस्टीम बसवणाऱ्या कुटुंबीयांसाठी वार्षिक 15 हजार ते 18 हजार रुपयांची बचत होणार आहे. या योजनेची माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी "रुफटॉप सोलर योजनेद्वारे 1 कोटी कुटुंबीयांना दरमाहा 300 युनिटपर्यंच वीज मोफत मिळू शकेल," असं स्पष्ट केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केलेल्या या योजनेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना लाभ होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.