हैदराबाद Howara CSMT Express Derailed : हावडाहून मुंबईला येणाऱ्या हावडा सीएसएमटी एक्सप्रेसच्या अपघातानंतर केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरलं जात आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान झारखंड काँग्रेस कार्याध्यक्ष बंधू तिर्की यांनी सरकारला जबाबदार धरलं. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मला गाड्यांबद्दल माहिती नाही, पण रेल्वे मंत्र्यांकडं काही 'कवच' नक्की आहे. त्यांच्या कार्यकाळात इतके रेल्वे अपघात होऊनही त्यांना हटवण्यात आलेलं नाही, अशी टीका त्यांनी केलीय.
प्रवासी रेल्वे गाड्या सातत्यानं रेल्वे रुळावरून घसरण्याच्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस रेल्वे प्रवास असुरक्षित होत चाललेला आहे. आज सकाळी हावडावरून मुंबईला येणाऱ्या रेल्वेगाडीचा मोठा अपघात झाला.
रेल्वे मॅनेजरनं सांगितला अनुभव : दक्षिण पूर्व रेल्वेचे ट्रेन मॅनेजर मोहम्मद रेहान यांनी अपघातादरम्यानचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, मी ट्रेनमध्ये उभा होतो. अचानक मी खाली पडलो. त्यानंतर एकामागे एक बोगी आदळू लागल्या. जेव्हा मी लोको पायलटला याबद्दल विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की, ट्रेन रुळावरून घसरली आहे. यावेळी एसी कोचची परिस्थिती सर्वात वाईट होती. अपघात झाला, त्यावेळी रेल्वे ताशी 120 किमी वेगाने धावत होती. पहाटे 3.39 च्या सुमारास गाडी रुळावरून घसरली आणि या घटनेत अनेक लोक जखमी झाले. डाऊनलाईनमध्ये एक मालगाडी आधीच रुळावरून घसरल्याने ही घटना घडली. त्यामुळे हा अपघात झाला असून, अपघातानंतर अपलाइनवर परिणाम झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.