नवी दिल्ली- इजिप्त म्हटलं की तुमच्यासमोर महाकाय आणि जगातील आश्चर्य असलेले पिरॅमिड डोळ्यासमोर येत असतील. प्रत्यक्षात इजिप्तला आता नवीन ओळख मिळालीय. पिरॅमिडमुळे प्रसिद्ध असलेला हा देश मलेरियामुक्त असलेला जगातील 44 वा देश ठरला आहे. इजिप्तनं मलेरियावर मात केल्याचं प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेने 20 ऑक्टोबर 2024 रोजी इजिप्त सरकारला दिले. विशेष म्हणजे मलेरिया रोगाचं अस्तित्व हजारो वर्षांपासून इजिप्तमध्ये आहे.
इजिप्तची लोकसंख्या सुमारे 11 कोटींहून अधिक जास्त आहे. 2010 नंतर पूर्व भूमध्य प्रदेशातील मलेरियामुक्त हे प्रमाणपत्र मिळविणारा इजिप्त हा पहिला देश ठरला आहे. इजिप्तचे सरकार आणि नागरिक जवळपास 100 वर्षांपासून मलेरिया रोगाचा देशातून नायनाट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. डासापासून पसरणाऱ्या मलेरियाला देशातून घालवून देणं हे तेवढं सोप नव्हते. मलेरिया हा प्राचीन काळापासून इजिप्तमध्ये अस्तित्वात आहे. एवढचं नव्हे तर पिरॅमिडमध्ये आढळणाऱ्या ममींनाही मलेरिया झाल्याचं डीएनए संशोधनातून समोर आलं आहे.
एखाद्या देशाला मलेरियामुक्त प्रमाणपत्र कसे मिळते?सलग तीन वर्षांपासून देशात मलेरिया रोग पसरला नाही, हे सिद्ध केल्यानंतर मलेरियामुक्त देश असलेलं प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेकडून दिलं जाते. त्यासाठी केवळ मलेरियाचे प्रसारण रोखणं पुरसं नाही. तर पुन्हा मलेरिया होऊ नये, यासाठी देशामध्ये मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची क्षमता आणि प्रयत्न दाखवून द्यावे लागतात. आजवर इजिप्तसह 44 देश आणि एका केंद्रशासित प्रदेशाला मलेरियामुक्त प्रमाणपत्र मिळविता आलं आहे.
- इजिप्तला 20 ऑक्टोबर, 2024 रोजी मलेरियामुक्त देश म्हणून जाहीर करण्यात आलं.
- इजिप्तच्या या यशाला जागतिक आरोग्य संघटनेनं ऐतिहासिक यश असे म्हटलं आहे.
- मलेरिया मुक्त प्रमाणपत्र प्रदान करण्याचा अंतिम निर्णय मलेरिया निर्मूलन आणि प्रमाणन (TAG-MEC) वरील स्वतंत्र तांत्रिक सल्लागार गटाच्या शिफारशीवर आधारित असतो. तांत्रिक गटाच्या शिफारसीवर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक निर्णय घेतात.
देश मलेरियामुक्त कसा झाला?इजिप्तमध्ये गेल्या 100 वर्षांपासून मलेरियाचा नायनाट करण्याकरिता प्रयत्न सुरू राहिले आहेत. गेल्या दशकभरात इजिप्तनं आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. विशेष म्हणजे, 95 टक्के इजिप्शियन लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा सुविधा त्यांच्या राहत्या घरापासून 5 किलोमीटरच्या आत मिळतात. सुदानमधील अनेक लोक बेकायदेशीपणे इजिप्तमध्ये राहतात. त्यांनादेखील इजिप्तमध्ये मलेरियाचे निदान आणि उपचार मोफतपणे दिले जातात. भारत 2027 पर्यंत मलेरियामुक्त करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे.