शिमला: Vikramaditya Singh : हिमाचल प्रदेशमध्ये मंगळवारी राज्यसभा निवडणूक झाली. त्यामध्ये काँग्रेसच्या सहा आमदारांनी बंडखोरी करत भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं. त्यामुळे काँग्रेसकडे बहुमत असतानाही भाजपचा उमेदवार तिथे विजयी झाला. तसंच, सरकारमधील मंत्री आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर येथील सरकार टिकेलं की नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, काँग्रेसनं येथे काही वरिष्ठ नेते पर्यवेक्षक म्हणून पाठवले. त्यानंतर त्यांची विक्रमादित्य यांच्याशी चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्यानं अखेर विक्रमादित्य सिंह यांनी आपला राजीनामा मागं घेत असल्याचं जाहीर केलं.
पुतळा बसवण्यासाठी जागा मिळत नाही : विक्रमादित्य सिंह यांनी आज सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. विक्रमादित्य सिंह यांनी सक्खू सरकारवर आपल्या आमदारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. तसंच, आपल्या वडिलांची तुलना शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्याशी केल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेत ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण निवडणूक वीरभद्र सिंह यांच्या नावावर झाल्याचंही ते यावेळी म्हणाले. तसंच, मला जड अंत:करणानं सांगायचं आहे की, हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार ज्या व्यक्तीमुळे स्थापन झालं, त्यांचा पुतळा बसवण्यासाठी शिमल्यातील मॉल रोडवर 2 एकर जागाही मिळत नाही. हे दुर्दैवी आहे, असं म्हणत त्यांनी आपली खंत व्यक्त केली होती.
निरीक्षक पक्षाच्या आमदारांशी बोलले : यावर प्रकरणावर बोलताना काँग्रेस खासदार राजीव शुक्ला म्हणाले, "शिमल्यात आलेले आमचे निरीक्षक पक्षाच्या आमदारांशी बोलले. त्यांचं मत घेतल. सर्वप्रथम त्यांनी पीसीसी प्रमुखांची भेट घेतली. विक्रमादित्य सिंह यांचीही भेट घेतली. विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा आपण स्वीकारणार नसल्याचं मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी म्हटलं होतं. विक्रमादित्य सिंह यांनीही राजीनाम्यासाठी दबाव आणणार नाही, असं मान्य केलं होतं.
कोण आहेत विक्रमादित्य सिंह ? : विक्रमादित्य सिंह हे हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि राज्य काँग्रेसच्या प्रमुख प्रतिभा सिंह यांचे पुत्र आहेत. ते शिमला ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार आहेत. विक्रमादित्य सिंह हे दिल्ली विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी हंसराज कॉलेजमधून ग्रॅज्युएशन आणि सेंट स्टीफन्स कॉलेजमधून मास्टर्स केलं आहे. 2013 मध्ये हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. 2013 ते 2017 दरम्यान ते हिमाचल युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. सध्या ते हिमाचल प्रदेश सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.