धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) Trekkers died in Kangra : हिमाचल प्रदेशात सध्या बर्फवृष्टी होत आहे. या ऋतूत थोडासा निष्काळजीपणा तुमचा जीव घेऊ शकतो. पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कांगडा जिल्ह्यातील बीर बिलिंगमध्ये मंगळवारी एका मुला आणि मुलीचं मृतदेह सापडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघंही ट्रेकिंगसाठी गेले होते, मात्र परतत असताना घसरुन पडून त्यांचा मृत्यू झाला. 30 वर्षीय अभिनंदन गुप्ता आणि 26 वर्षीय प्रणिता बाळासाहेब अशी मृतांची नावं असून यातील 26 वर्षीय मुलगी ही महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर येतेय.
पाळीव कुत्र्यामुळं सापडले होते मृतदेह : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचेही मृतदेह त्यांच्यासोबत असलेल्या पाळीव कुत्र्यामुळं सापडले. तरुण आणि तरुणीच्या मित्रांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बचाव पथक रवाना करण्यात आलं होतं. कांगडा एएसपी बीर बहादूर यांनी सांगितलं की, कुत्र्याच्या सतत भुंकण्यामुळं बचाव पथक घटनास्थळी पोहोचू शकलं. तिथं मंगळवारी दोघांचे मृतदेह सापडले.
रविवारी निघाले होते ट्रेकिंगसाठी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबच्या पठाणकोटचा रहिवासी अभिनंदन गेल्या 4 वर्षांपासून स्थानिक गावात राहत होता. तो पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंग करत होता. तर प्रणिताही काही दिवसांपूर्वीच इथं आली होती. बर्फवृष्टी पाहता रविवारी दोन जोडपे ट्रेकिंगसाठी बाहेर पडले होते. सोमवारी एक जोडपं ट्रेकिंगवरून परतले, पण बराच वेळ होऊनही अभिनव आणि प्रणिता परत न आल्यानं त्यांच्या मित्रांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी रेस्क्यू टीम पाठवली.
"प्रथम दृष्टीक्षेपात असं दिसतं की दोघंही बर्फात घसरल्यानं जखमी झाले आणि नंतर प्रचंड थंडीमुळं दोघांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. दोन्ही मृतदेहांचं शवविच्छेदन करुन ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत." - बीर बहादूर, एएसपी, कांगडा