नवी दिल्ली : दिल्लीतील १९८४ च्या शीखविरोधी दंगली प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हे प्रकरण दंगलीच्या वेळी दिल्लीतील सरस्वती विहार येथे जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांच्या हत्येशी संबंधित आहे. पीडितेच्या बाजूने मृत्युदंडाची मागणी केली होती.
सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा : सज्जन कुमार यांना १२ फेब्रुवारी रोजी दोषी ठरवण्यात आलं. न्यायालयानं २१ फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगलींदरम्यान सरस्वती विहार प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयानं मंगळवारी निकाल दिला. न्यायालयाने दोषी आढळलेले माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी हा निकाल दिला. न्यायालयाने १२ फेब्रुवारी रोजी सज्जन कुमार यांना आधीच दोषी ठरवलं होतं. या प्रकरणात सीबीआय आणि तक्रारदाराने सज्जन कुमार यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती.
जमावाला हल्ला करण्यास प्रवृत्त केलं :राऊस अव्हेन्यू न्यायालयानं दोषी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांच्या शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. पीडितेच्या बाजूने सज्जन कुमार यांना मृत्युदंडाची मागणी केली होती. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी २५ फेब्रुवारी रोजी निकाल देण्याचे आदेश दिले होते. तक्रारीनुसार, सज्जन कुमार यांनी जमावाला हल्ला करण्यास प्रवृत्त केलं होतं, त्यानंतर जमावाने सरदार जसवंत सिंग आणि सरदार तरुणदीप सिंग यांना जिवंत जाळले. जमावाने पीडितांच्या घरांची तोडफोड, लूटमार आणि आग लावली. तत्कालीन रंगनाथ मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगासमोर तक्रारदाराने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे, सरस्वती विहार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला, ज्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
सज्जन कुमारांविरुद्ध ३ खटले, १ मध्ये निर्दोष, २ मध्ये दोषी : दिल्ली कॅन्टमधील पालम कॉलनीमध्ये ५ शिखांच्या हत्येनंतर गुरुद्वाराला आग लावली. या प्रकरणात सज्जन कुमार दोषी आढळले. दिल्ली उच्च न्यायालयानं १७ डिसेंबर २०१८ रोजी त्यांना या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये, दिल्लीतील सुलतानपुरी येथे झालेल्या ३ शिखांच्या हत्येप्रकरणी राऊस अव्हेन्यू न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं. १ नोव्हेंबर १९८४ रोजी सरदार जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची सरस्वती विहारमध्ये हत्या करण्यात आली. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सज्जन कुमार यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. २५ फेब्रुवारी रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
हेही वाचा :
- दिल्ली विधानसभा अधिवेशन 2025 : विधानसभा अध्यक्षांचा दणका, आम आदमी पार्टीच्या 12 आमदारांचं पहिल्याच सत्रात निलंबन
- लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरण : दिल्लीतील न्यायालयाचे लालू प्रसाद यादव, हेमा यादव आणि तेजप्राताप यादवांना समन्स
- आगामी काळात 6 वर्षांत 500 गिगावॅट वीजनिर्मिती करणार, केंद्रीय ऊर्जामंत्र्यांचा विश्वास