हैदराबात Father Day: प्रत्येक मुलांसाठी त्याचे वडील सुपरहीरो असतात. बाहेरून कणखर आणि आतून मऊ अशा दोन्ही भूमिका पार पाडणाऱ्या वडिलांसमोर बहुतेकांना आपल्या समस्या मांडता येत नसतील. पण आईबरोबरच वडिलांजवळदेखील मुलांचं मन समजण्याचं कौशल्य असतं. भावनांना मुरड घालून मुलांना घडविण्याकरिता बाप अहोरात्र कष्ट करत असतो. वडिलांचं आभार प्रत्येक मुलांनी मानायलाच हवं. वडील आणि मुलांच्या या अनमोल नात्याला आणखी घट्ट करण्यासाठी दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' साजरा केला जातो.
युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा, भारत आणि जगभरातील इतर अनेक देशांमध्ये दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' साजरा केला जातो. अनेक देशात वर्षाच्या इतर वेळीही ही सुट्टी साजरी करतात. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी 'फादर्स डे' साजरा केला जातो. नॉर्वे, स्वीडन आणि फिनलंडमध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या रविवारी आणि काही कॅथोलिक देशांमध्ये हा 19 मार्च (सेंट जोसेफ डे) म्हणून साजरा केला जातो.
फादर्स डेची सुरुवात- 'फादर्स डे'ची सुरुवात स्पोकेन, वॉशिंग्टन येथील सोनोरा स्मार्ट डॉड या महिलेनं केली. तिला 'फादर्स डे'चं संस्थापक मानलं जातं. ती वडीलांच्या छत्र छायेखाली वाढली. वडिलांनी तिला कधीच आईची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे वडिलांवरील कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी सोनोरानं स्थानिक चर्च, वायएमसीए आणि दुकानदारांना 'फादर्स डे' साजरा करण्याचं आवाहन केलं. वॉशिंग्टन हे 19 जून 1910 रोजी 'फादर्स डे' साजरा करणारं पहिलं राज्य बनलं.
'फादर्स डे'चा इतिहास-युनायटेड स्टेट्समध्ये 'फादर्स डे'च्या दिवशी सुट्टी असते. (जूनमधील तिसरा रविवार) या सुट्टीचं श्रेय स्पोकेन, वॉशिंग्टनच्या सोनोरा स्मार्ट डोड यांना दिलं जातं, तिच्यामुळे हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. बाळाच्या जन्मादरम्यान तिच्या आईचं निधन झालं. त्यानंतर तिच्या वडीलांनीचं तिच आणि तिच्या पाच भावंडांचं संगोपन केलं. १९०९ मध्ये मदर्स डेच्या दिवशी एका चर्चमध्ये सोनेरानं प्रवचन ऐकलं. त्यानंतर तिला हा दिवस साजरा करण्याची कल्पना सुचली.
स्थानिक धार्मिक नेत्यांनी या कल्पनेला पाठिंबा दिला. पहिला 'फादर्स डे' 19 जून 1910 रोजी साजरा करण्यात आला. डोडच्या वडिलांचा त्या दिवशी वाढदिवस होता. 1924 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष केल्विन कूलिज यांनी 'फादर्स डे' साजरा करण्यास अधिकृत मान्यता दिली. 1966 मध्ये, अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने हा दिवस ओळखून एक घोषणा जारी केली. 1972 मध्ये राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी जूनमधील तिसरा रविवार फादर्स डे म्हणून घोषित करण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी केल्या. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येतो.
असं 'फादर्स डे' करा साजरा
- वडिलांकरिता पुष्पगुच्छ तयार करा आणि त्यांना सरप्राईज द्या. त्यामुळे तुमच्या आयुष्यात त्यांची भूमिका किती खास आहे, हे कळेल.
- तुमचे वडिलांना पुस्तकांची आवड असेल तर त्यांना त्यांच आवडतं पुस्तक भेट द्या. त्यांच्या पुस्तकाची 'बकेट लिस्ट' बघा. त्यांना जे पुस्तक बऱ्याच काळापासून वाचण्याची इच्छा असेल ते पुस्तक भेट द्या.
- वडिलांकरिता स्वत: केक बनवा.
- तुमच्या वडिलांना बागकामाची आवड असेल तर मग त्यांना रोपं भेट द्या. त्यांचा दिवस खास बनवा.
- तुमच्या वडिलांना कविता आवडत असेल त्यांच्यासाठी मनापासून लिहा. तुमच्या भावनांची मांडणी पाहून वडीलही भावूक होतील.
- वडिलांबरोबर लहानपणापासून ते आतापर्यंतचे खास फोटोंचा एक व्हिडिओ तयार करा. त्यात वडिलांसाठी काही कोट्स टाका. हा व्हिडिओ पाहून त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतील.
- वडिलांपासून दूर असल्यास गावात राहणाऱ्या स्थानिक मित्रांच्या मदतीनं वडिलापर्यंत 'फादर्स डे'चं गिफ्ट पोहोचवा.
हेही वाचा
- पृथ्वी वाचवा, आपलं भविष्य वाचवा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जंगल वाचवण्याचा संदेश - World Environment Day 2024
- 'जागतिक रक्तदाता दिवस'!जाणून घ्या रक्तदानाचे फायदे - WORLD BLOOD DONATION DAY