भुवनेश्वर :ओडिशा राज्यात दाना चक्रीवादळानं मोठा धुमाकूळ घातला आहे. दाना चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र आज पहाटे 1.30 ते 3.30 वाजताच्या दरम्यान दाना चक्रीवादळानं हबलीखाटी निसर्ग शिबीर आणि धमाराजवळील उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीला 100 ते 110 प्रतितास वाऱ्याच्या वेगानं ओलांडलं आहे. दाना चक्रीवादळाचा वेग आता पुढं 120 प्रतितास झाला असून ते पुढं सरकत आहे.
दाना चक्रीवादळाचा ओडिशात हाहाकार सुरूच :दाना चक्रीवादळाचा ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीवर मोठा धुमाकूळ सुरू आहे. दाना चक्रीवादळानं हबलाती निसर्ग शिबिराजवळून पुढं वाटचाल सुरू केली आहे. सध्या दाना चक्रीवादळाचा वेग प्रतितास 120 च्या दरम्यान आहे. बंगालच्या वायव्य उपसागरावर तीव्र झालेलं दाना चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेनं पुढं सरकत आहे. दाना चक्रीवादळानं उत्तर-वायव्य दिशेनं वाटचाल केली. दाना चक्रीवादळाच्या वायव्य दिशेला बंगालचा उपसागर अक्षांश 20.60 अंश उत्तर आणि रेखांश 87.00 अंशाजवळ हबलीखाती निसर्ग शिबिराजवळून हे वादळ पुढं सरकत आहे, असं हवामान विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या बुलेटीनमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दाना चक्रीवादळामुळे ओडिशात मोठी पडझड सुरू आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली आहेत.