कोलकाता Doctor Murder Rape Case :कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर करण्यात आलेल्या बलात्कार आणि खून प्रकरणानं देशभर खळबळ उ़डाली. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान नियुक्त करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे गुरुवारीच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात बेट दिली. त्यानंतर लगेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नियुक्त करण्यात आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला घेतलं फैलावर :सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि खून प्रकरणात सुनावणी घेतली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्य सरकारच्या वकिलांना चांगलंच फैलावर घेतलं. पश्चिम बंगाल सरकारच्या वतीनं भूमिका मांडताना वकिलांनी वेगवेगळी माहिती न्यायालयात देण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सरन्यायाधीशांनी खडे बोल सुनावत आमच्याकडं या घटनेतील शवविच्छेदन अहवाल असल्याचं स्पष्ट करत त्यांच्या माहितीतील हवाच काढून घेतली. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर या प्रकरणातउशीरानं गुन्हा दाखल करुन घेतल्यावर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली.