भोपाळ Ujjain BJP leader Murder : मध्य प्रदेशातील उज्जैनमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकल्यानंतर भाजपा नेते रामनिवास कुमावत आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. उज्जैनच्या देवास रोडवर असलेल्या पिपलोडा गावात ही घटना घडली. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, या हत्याकांडानं परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
घरात सामान विखुरलेलं :सदरील घटना आज (27 जानेवारी) पहाटे घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी हजर असून घरातील साहित्य विखुरलेलं असल्यानं घरात दरोडा पडल्याचा संशय बळावला. गावातील लोक मोठ्या संख्येनं घराबाहेर जमले आहेत. एसपी सचिन शर्मा आणि अतिरिक्त एसपी ग्रामीण नितेश भार्गव यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी या घटनेचा तपास करण्यात व्यस्त आहेत. आरोपी कोणीही असलं तरी त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. रामनिवास कुमावत यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.