बेमेटारा (छत्तीसगड) Bemetara Road Accident : छत्तीसगडमधील बेमेटारा जिल्ह्यातील काठिया गावातील पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री एक भीषण अपघात झालाय. मालवाहू वाहन आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झालीय. या अपघातात पाच महिला आणि तीन मुलांचा मृत्यू झालाय. तर वाहनातील इतर 23 जण जखमी झाले आहेत. या जखमींना बेमेटारा जिल्हा रुग्णालय, सिमगाच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं. काही गंभीर जखमींना रायपूरच्या एम्समध्ये पाठवण्यात आलंय.
रविवारी रात्री काठीया गावाजवळ घडला अपघात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा बेमेटारा जिल्ह्यातील काठिया गावाजवळ हा अपघात झाला. बेमेटारा जिल्ह्यातील पाथरा गावातील लोक नामकरण सोहळ्यासाठी तिरैया गावात गेले होते. एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वजण पतर्रा गावी घरी परतत होते. मालवाहू वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मिनी ट्रकला धडकलं. या अपघातात पाच महिला आणि तीन मुलांचा मृत्यू झाला. तर यातील 23 जखमींना दोन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. चार गंभीर जखमींना रायपुरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये पाठवण्यात आलंय.
बेमेटराचे जिल्हाधिकारी-एसपी, आमदार रुग्णालयात : या अपघाताची माहिती मिळताच बेमेटराचे आमदार दीपेश साहू, जिल्हाधिकारी रणवीर शर्मा आणि एसपी रामकृष्ण साहू यांनी जिल्हा रुग्णालयात पोहोचून जखमींची भेट घेतली. मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केल्याचे बेमेटाराचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी सांगितलं.