लखनऊ :उत्तर प्रदेशातील महाराजगंज इथं 13 ऑक्टोबरला झालेल्या राम गोपाल मिश्रा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी 5 आरोपींना अटक केली. हे आरोपी नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना घेरलं. यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर चकमक उडाली. या चकमकीत सरफराज आणि तालीम हे दोन आरोपी गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी आरोपींनी पोलिसांना "आम्ही चूक केली असून अशी चूक पुन्हा करणार नाही," असं आर्जव केलं.
नेपाळ सीमेवर आरोपींची पोलिसांसोबत चकमक :बहराईच हत्याकांडानंतर आरोपी नेपाळमध्ये पळून जात होते. यावेळी पोलिसांनी नेपाळ सीमेवरील हांडा बसहेरी कालव्याजवळ पोलिसांनी आरोपींना थांबण्याच्या सूचना केल्या. मात्र आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलिसांनीही आरोपींनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत सर्फराज आणि तालीम जखमी झाले आहेत. दोघांच्या पायात गोळी लागली असून पोलिसांनी तिथून पकडलं. यावेळी दोघांना गोळी लागल्यानं ते वेदनेनं ओरडत होते. "साहेब, माझ्याकडून चूक झाली, मी पुन्हा असं करणार नाही." त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये पोलीस आरामात चालायला सांगत आहेत. आधी त्यांनी गुन्हा केल्यानंतर त्यातून पळून जाण्याचा आणि पोलिसांवर गोळीबार करण्याचा गुन्हा केला. यावर मारेकरी म्हणाला की, "सर, आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो, गोळीबार करणे चूक झाली, आम्ही पुन्हा असं करणार नाही."
आरोपींनी केला पोलिसांवर गोळीबार :याबाबत पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी सांगितलं की, "मोहम्मद फहीन, मोहम्मद तालीम उर्फ सबलू, मोहम्मद सरफराज, अब्दुल हमीद आणि मोहम्मद अफजल अशी अटक करण्यात आलेल्या 5 जणांची नावं आहेत. सर्फराज आणि तालीमच्या सांगण्यावरून पोलीस पथक त्यांना हत्येसाठी वापरलेलं हत्यार जप्त करण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी आरोपींनी तिथं ठेवलेल्या शस्त्रांसह पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोघांच्या पायात गोळी लागली आहे. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहराईच हत्येसाठी वापरलेली शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत."