हैदराबाद April Fool Day : दरवर्षी 1 एप्रिल रोजी जगभरात एप्रिल फूल डे साजरा केला जातो. हा दिवस अमर्याद हास्य आणि आनंदासाठी समर्पित आहे. यादिवशी सहसा लोक खोडसाळपणा करतात. या प्रसंगी, लोक त्यांच्या प्रियजनांना किंवा मित्रांना आश्चर्यचकित करण्यासाठी हास्यास्पद कल्पना घेऊन येतात. शेवटी हे सर्व खोटं असल्याचं उघड करतात. शतकानुशतकं वेगवेगळ्या देशामध्ये एप्रिल फूल डे साजरा करण्यात येतोय.
एप्रिल फूल डे 1 एप्रिलला का साजरा केला जातो? : एप्रिल फूल डे कसा सुरू झाला, याबाबत अनेक कथा आणि कल्पना आहेत. परंतु सर्वात सामान्य कथेनुसार, या दिवसाची उत्पत्ती 16 व्या शतकाच्या उत्तरार्धात असल्याचं मानलं जातं. त्या वेळी, पोप ग्रेगरीने (तेरावे) ग्रेगोरियन कॅलेंडरची अंमलबजावणी 1 जानेवारी रोजी वर्षाच्या सुरुवातीस प्रस्तावित केली. त्यामुळे मार्चच्या शेवटी नवीन वर्ष साजरं करण्याची परंपरा बदलली. तथापि, काही लोकांना या बदलाची माहिती नव्हती. त्यांनी 1 एप्रिल रोजी नवीन वर्ष साजरा करणं सुरू ठेवलं. यामुळं इतरांकडून थट्टा केली जात होती. 1 एप्रिल रोजी नवीन वर्ष साजरे करणाऱ्यांना 'मूर्ख' म्हटले गेले. अशा प्रकारे एप्रिलच्या पहिल्या दिवशी 'एप्रिल फूल डे' साजरा करण्याची परंपरा अस्तित्वात आली.
जगभरात लोक एप्रिल फूल डे कसा साजरा करतात? : जरी तो जगभरातील सर्व देशांमध्ये साजरा केला जात असला तरी, ही सार्वजनिक सुट्टी नाही. तसंच, फ्रान्समध्ये एप्रिल फूलच्या दिवशी मुलांनी त्यांच्या पाठीला कागदी मासे बांधून त्यांच्या मित्रांसोबत विनोद करण्याची प्रथा आहे. स्कॉटलंडमध्ये हा उत्सव दोन दिवस चालतो. दुसरा दिवस टॅली डे म्हणून ओळखला जातो. या प्रथेनं 'किक मी' सिग्नलला चालना दिल्याचं मानलं जाते. न्यूयॉर्कमध्ये 1986 पासून दरवर्षी अस्तित्वात नसलेल्या एप्रिल फूल डे परेडसाठी बनावट प्रेस रिलीझ जारी करण्यात येते.