नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाच्या चार वरिष्ठ नेत्यांनादेखील अटक होणार असल्याचा दावा मंत्री आतिशी यांनी केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी मला, भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्ढा यांना अटक करण्यात येणार आहे, असे सांगत त्यांनी घाबरणार नसल्याचं सांगितलं.
आतिशी म्हणाल्या की, "भाजपाकडून धमकाविलं जात आहे. भाजपाकडून माझ्या जवळच्या व्यक्तीला सांगण्यात आले की, पक्षात सामील होऊन राजकीय करियर वाचवावे. अन्यथा एका महिन्यात ईडीकडून अटक करण्यात येणार आहे. रविवारी रामलीला मैदानावरील गर्दी पाहून भाजपा पक्षातील नेते हैराण झाले आहेत. आप पक्षाच्या नेत्यांना अटक केल्याशिवाय पक्ष संपणार नसल्याचं भाजपा नेत्यांना वाटत आहे. ईडीकडून आम आदमी पक्षाच्या चार वरिष्ठ नेत्यांना अटक केली जाणार आहे. त्यामध्ये मला, सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा आणि दिलीप पांडेय यांना अटक केली जाईल.
आम्ही भगतसिंग यांचे शिष्य -"माझ्या घरावर लवकरच छापे पडणार आहेत. त्यानंतर समन्स बजावून अटक करण्यात येईल. मी भाजपाला सांगू इच्छिते की, आम्ही धमक्यांना घाबरणारे नाही. आम्ही अरविंद केजरीवाल यांचे सैनिक आहोत. आम्ही भगतसिंग यांचे शिष्य आहोत. आपच्या प्रत्येक मंत्री, आमदाराला तुरुंगात टाकले तरी घाबरणार नाही. जेवढे लोकांना तुरुंगात टाकाल, तेवढे लोक पुढे येऊन भाजपाला पराभूत करतील," असा विश्वास मंत्री आतिशी यांनी व्यक्त केला.