भोपाळ : भरधाव डंपरनं अनेक वाहनांना चिरडल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील भिंड इथल्या जवाहरपुरा गावाजवळ ही घटना मंगळवारी पहाटे घडली. डंपरनं रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे या वाहनातील 5 जण ठार झाले असून 8 जण गंभीर झाले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनी या अपघातप्रकरणी दु:ख व्यक्त केलं आहे.
लोडींग ऑटोमध्ये बसलेले होते वऱ्हाडी :मंगळवारी पहाटे 5 वाजता भिंडमधील जवाहरपुरा गावाजवळ एका लोडींग ऑटोमध्ये वऱ्हाडी बसले होते. यावेळी भरधाव आलेल्या अनियंत्रित डंपरनं रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या या लोडींग ऑटोला जोरदार धडक दिली. त्यामुळे लोडिंग ऑटोत बसलेले पाच जण जागीच ठार झाले. तर वाहनात बसलेले 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग 719 वर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोडिंग ऑटोमध्ये बसलेले सर्व नागरिक लग्न समारंभातून गावाकडं परत येत होते. या ठिकाणी असे अपघात नेहमी घडत असूनही त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला.
याच ठिकाणी 24 तासात दुसरा अपघात :भिंडमधील जवाहरपुरा गावाजवळ या ठिकाणी अरुंद रस्ता असल्यानं असे अपघात वारंवार घडतात, असं संतप्त ग्रामस्थांनी सांगितलं. 24 तासांत अपघाताची घडलेली ही दुसरी घटना आहे. रविवारी इथं लग्नातून परतणाऱ्या एका तरुणाला एका ट्रकनं चिरडलं. या घटनेनंतर जवाहरपूर गावातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले.