मुंबई - मुंबईकरांसाठी सोमवारी 9 डिसेंबरची रात्र काळरात्र ठरलीय. कारण या दिवशी रात्री एका इलेक्ट्रिक बस अपघातात 7 निष्पाप मुंबईकरांना आपला जीव गमावावा लागलाय. चालक संजय मोरे हा 9 दिवसांपूर्वी नोकरीवर रुजू झाला होता. त्याला कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं आणि त्यानं मद्यप्राशन केलं होतं, असं बोललं जातंय. तर वाढत्या एसटी आणि बसच्या अपघातामुळं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, खासगीकरण केल्यामुळं अपघातांच्या घटनांत वाढ होतेय, असा आरोप आता भाजपाच्या नेत्यांकडून केला जातोय. दुसरीकडे एसटी किंवा बस हे सरकारी अखत्यारित असताना अपघातांची संख्या कमी होती, शून्य अपघात, असा लौकिक असलेल्या एसटी आणि बसचा होता, मात्र आता खासगीकरण केल्यामुळं बस आणि एसटीच्या अपघातात वाढ झालीय. परिणामी शून्य अपघात ते आता अपघातांची मालिकाच सुरूच झालीय.
बेस्ट अपघातात मागील वर्षी किती बळी? : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी आणि बसच्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येतंय. दुसरीकडे मुंबईतील बेस्ट बस ही मुंबईकरांसाठी रेल्वेनंतर दुसरी जीवनवाहिनी समजली जाते. या बेस्ट बसमधून अनेक चाकरमानी प्रवास करीत असतात. मात्र बेस्टची सुरक्षितता आणि अपघातांच्या वाढलेल्या संख्येमुळं आता बेस्टवरील मुंबईकरांची विश्वासार्हता हळूहळू कमी होत असल्याचं दिसून येतंय. मागील एका वर्षात बेस्ट अपघातात आठ मुंबईकरांना आपला जीव गमावावा लागलाय. त्यामुळं आता बेस्टमधील खासगीकरण केल्यामुळं भाजपाने शिवसेना उबाठा गटावर टीकास्त्र डागलंय. दुसरीकडे महामंडळाच्या शिवशाही बसच्या अपघाताचे प्रमाण वाढलेत किंवा या बसला आग लागण्याच्या घटनात वाढ झालीय. त्यामुळं शिवशाही बस बंद होणार, अशी चर्चा सुरू आहे. तसेच एसटीमध्ये मागील 5 वर्षांत अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. एसटीत 2022-23 या वर्षी अपघातामुळं 343 जणांचे बळी गेलेत. तर 2023-24 नोव्हेंबरपर्यंत 201 निष्पाप लोकांना आपला जीव गमावावा लागला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी "ईटीव्ही भारत"ला दिली आहे.
खासगीकरणामुळे अपघातांच्या संख्येत वाढ? : दुसरीकडे एसटी आणि बेस्ट बसवर सरकारचे नियंत्रण होते, तेव्हा अपघाताची संख्या कमी होती. कारण जो चालक-वाहक होता, त्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळत होतं. परंतु आता खासगीकरणामुळे चालक-वाहक यांना प्रशिक्षण मिळत नाही. वेळेवर पगार मिळत नाही आणि बस घाईनं चालवत असल्यामुळं अपघातांची संख्या वाढत आहे, असं बोललं जातंय. तर दुसरीकडे मुंबईतील बेस्ट बसचं खासगीकरण हे शिवसेना उबाठा गटातील आदित्य ठाकरे यांनी केलंय, अशी टीका भाजपा नेते प्रभाकर शिंदे यांनी केलीय. तसेच "आजमितीस बेस्ट ताफ्यातील 3000 बेस्ट बसपैकी 2000 बेस्ट बस या भाडेकरार तत्त्वावर चालविण्यात येतात. या भाडेकरार तत्त्वावर बसचा पुरवठा करणारा कंत्राटदारच सदर बससाठी चालक आणि वाहक यांची व्यवस्था करतो. बऱ्याच वेळा असे लक्षात आले आहे की, कंत्राट दराने नेमलेले बस चालक हे नवीन असतात आणि त्यामुळे त्यांना मुंबईच्या रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी बसेस चालवताना अडचण येते. त्यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत चाललंय. बेस्टमध्ये भाडे करार तत्त्वावर बसेस घेण्याचे कंत्राट वर्ष 2018 ते 2021 या काळात तत्कालीन सत्ताधारी उबाठा सेनेच्या नेतृत्वात आणि उबाठा सेनेचे युवराज आदित्य ठाकरेंच्या आदेशानुसार देण्यात आले होते. त्यावेळी भाजपाने सदर प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते," असं पत्र भाजपा नेते प्रभाकर शिंदे यांनी बेस्ट प्रशासनाला लिहिलंय.
पुणे अपघाताची झाली आठवण : सोमवारी कुर्ल्यात अपघात झाला होता. यावेळी 7 जणांचा जीव गेला असून, अजून काही जण गंभीर जखमी आहेत. परंतु कुर्ल्यातील अपघातानंतर पुण्यात एसटीच्या झालेल्या अपघाताची आठवण झाली. 25 जानेवारी 2012 साली स्वारगेट डेपोमध्ये काम करणाऱ्या माथेफिरू संतोष माने याने मद्यपान करून बस चालवली. समोर येईल त्याला बसखाली चिरडले. संतोष मानेनं अंदाधुंदपणे एसटी चालवली, यात 9 निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला होता. कुर्ल्याच्या अपघाताची घटना ताजी असताना पुण्याच्या अपघाताची घटना आठवल्यानंतर पुणेकरांचा आजही थरकाप उडतो.
कठोर कारवाई करणार - बेस्ट प्रशासन : कुर्ल्यातील अपघातानंतर बेस्ट प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. नवख्या चालकाला बस चालवायला कशी दिली जाते? असं प्रश्न उपस्थित केला जातोय. यावर बोलताना बेस्ट जनरल मॅनेजर अनिल डिग्गीकर यांनी म्हटलंय की, "आरटीओ आणि बेस्ट प्रशासन दोन्ही मिळून या प्रकरणाची चौकशी करीत आहोत. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. भविष्यात असे अपघात घडू नयेत, यासाठी बेस्ट प्रशासन खबरदारी घेतेय. या संदर्भात एक समिती गठीत करण्यात येत असून, बेस्टच्या सर्व चालकांचे वाहकांचे ऑडिट करण्यात येईल. यात ज्या चालकांना वाहकांना प्रशिक्षणाची गरज आहे, त्यांना पुन्हा एकदा प्रशिक्षण दिले जाईल. चालकांचा वाहन चालवण्याचा अनुभवदेखील यावेळी लक्षात घेतला जाईल," असं बेस्ट जनरल मॅनेजर अनिल डिग्गीकर म्हणालेत. दरम्यान, मुंबईत अनेक भागात दाटीवाटीची वस्ती आहे. बेस्ट प्रशासनाने येथे मिनी बस सुरू केल्या होत्या. परंतु 6 महिन्यांपूर्वी या मिनी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. आता मोठ्या इलेक्ट्रिक बसमुळे दाटीवाटीच्या किंवा अरुंद रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होतेय, असं शिवसेने (ठाकरे)चे आमदार सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा :