नांदेड Youth success Nanded: अशोक गंगासागरे हा नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील गौरी शेळगाव येथील रहिवासी आहे. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील हे बूट बनवण्याचं आणि पॉलिश करण्याचं काम करतात. बुटपॉलिशचे काम करून त्यांनी अशोकला शिकवलं. (Govt Jobs) अशोकचं बीए डीएड शिक्षण पूर्ण झालं. २०१५ साली त्यानं गाव सोडून नांदेड येथे हॉस्टेलमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
अकॅडमी लावण्यासाठी पैसे नसल्यानं अशोक गंगासागरेनं हमाली सुरू केली. नवीन मोंढा परिसरातील कृषी उत्पन्न बाजार येथे २०१५ पासून तो सकाळ पासून खांद्यावर पोते वाहून मोलमजुरी करायचा. दिवसात दोन ते तीनशे रुपये त्याला मजुरी भेटायची. या पैश्यातून त्यानं अकॅडमी जॉईन केली. सकाळी हमाली आणि सायंकाळी तो अभ्यास करायचा. आतापर्यंत त्यानं अनेक परीक्षा दिल्या. मात्र त्याला यश आलं नाही. खचून न जाता त्यानं मुंबई महाराष्ट्र सुरक्षा फोर्समध्ये पोलीस कॉन्टेबल पदासाठी परीक्षा दिली. ग्राउंड आणि लेखीमध्ये यश मिळवत त्याची पोलीस कॉस्टेबलसाठी निवड झाली.
हॉटेलमध्ये काम करून शिपाई परीक्षा उत्तीर्ण: दुसरीकडे गणेश लंगोटे यानंदेखील संघर्ष करत न्यायालयात शिपाई पद मिळवलं. तो मागील दहा वर्षांपासून एका हॉटेलमध्ये काम करत आहे. हॉटेलमध्ये चहा बनवणे, कॉफी, खिचडी तसेच हॉटेलचं साफसफाईचं सर्वसामान्य काम करत न्यायालयातील शिपाई पदाची परीक्षा पास होऊन कामावर न्यायालयातील शिपाई म्हणून निवड झाली आहे. गणेश लंगोटे यांचा संघर्ष अतिशय मोठा आहे. सकाळी चारला उठून हॉटेलच्या तयारी करावी लागायची. तरी दहा ते अकरा वाजेपर्यंत हॉटेलमध्ये काम करून पुन्हा बारा ते पाच या वेळेत एका फायनान्स कंपनीमध्ये काम करत होता. सायंकाळी घरी आल्यावर अभ्यास करून पुन्हा सकाळी चारला उठून नियमितपणे कामावर जाणं ही त्याची दिनचर्या होती. असं असताना देखील गणेश लंगोटे यानं जिद्दीनं अभ्यास करत न्यायालयीन परीक्षा उत्तीर्ण केली.
गणेश लंगोटेचा सत्कार: सर्वसामान्य घरातील लंगोटे यानं रात्रीला अभ्यास करून आणि कामातून वेळ काढून न्यायालयातील परीक्षा उत्तीर्ण केली. गणेश लंगोटे याच्या यशाचं कौतुक करत हमाल, मापारी संघटना आणि परिवारातील सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी त्याचा सत्कार केला. जिद्दीनं अभ्यास केल्यामुळेच गणेश लंगोटेला यश मिळालं असून त्याच्या या यशाबद्दल त्याच्या आईनं त्याचं कौतुक केलं.
हेही वाचा: