अमरावती Nilesh Sabe Young Businessman : आपला मुलगा अभियंता व्हावा यासाठी आई-वडिलांनी दोन एकर शेत गहाण ठेवलं. ग्रामीण भागातून आलेला मुलगा अमरावतीच्या प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट इथून 2018 मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान शाखेतून अभियंता म्हणून बाहेर पडला. पुण्यात त्याला 12 हजाराची नोकरी मिळाली. आता कर्ज फेडून गहाण ठेवलेलं शेत मुलगा परत मिळवेल, अशी अपेक्षा आई-वडिलांना होती. पुढं काय झालं? वाचा सविस्तर बातमी....
60 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल : "आपली शेती आताच परत मिळणार नाही. एक वर्ष वाट पाहा अन् माझ्यावर फक्त विश्वास ठेवा," या त्याच्या बोलण्यावर आई-वडिलांनी कसाबसा का होईना मात्र विश्वास ठेवला. हातची नोकरी त्यानं सोडली आणि उद्योजक होण्याचा ध्यास धरला. अडचणी देखील आल्या. मात्र, त्यावर मात करण्याचं धाडस त्याच्या अंगी होतं. त्याच्या मेहनतीला यश आलं आणि आज तो यशस्वी उद्योजक झाला. 60 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल त्याच्या व्यवसायाची आहे. ज्या महाविद्यालयातून तो अभियंता बनला, त्याच महाविद्यालयातील शंभरच्या वर मुलांना आपल्या कंपनीत नोकरीची संधी देण्यासाठी तो अमरावतीत आला. निलेश साबे असं या तरुण उद्योजकाचं नाव. 'ईटीव्ही भारत'नं तरुणांना प्रेरित करणारी त्याची यशोगाथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
नोकरी सोडून उद्योगाचा ध्यास : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येणाऱ्या कोळासा या छोट्याशा गावातील निलेश साबेला 2018 मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान शाखेची पदवी मिळवल्यावर पुण्यात एका कंपनीमध्ये 12 हजार रुपये वेतनावर काम मिळालं. अशी नोकरी करण्यापेक्षा आपण आपला काहीतरी व्यवसाय करावा असा त्यानं नोकरी मिळाल्यावर अगदी दोन-तीन महिन्यातच निश्चय केला. गावात असणारे वडील रामदास साबे आणि आई निर्मला साबे यांना मुलाच्या या निर्णयामुळं काहीसा धक्का बसला. आपल्यावर असणारं कर्ज कसं फिटेल याची चिंता त्यांना होती. मात्र, मुलावर देखील त्यांचा विश्वास होता. मुलाच्या निर्णयाला प्रोत्साहन देत त्यांनी त्याच्या पाठीवर थाप मारली. आई-वडिलांचा मिळालेला आशीर्वाद त्याच्यासाठी महत्त्वाचं बळ ठरलं आणि निलेश इतरांची चाकरी सोडून एक उद्योजक म्हणून उदयास आला.
उद्योग जगतावर काढलं मासिक : निलेश साबे यानं सुरुवातीला देशातील प्रमुख उद्योजकांवर 'स्विफ्ट एन लिफ्ट' या नावानं एक मासिक काढलं. यात उद्योजकांची यशोगाथा त्यानं मांडली. यासोबतच अनेक उद्योजकांना आपल्या उद्योगात आणखी नफा मिळेल अशी माहिती प्रकाशित करण्यास सुरुवात केली. या व्यवसायात यश मिळालं. यासाठी निलेशनं काही जणांना आपल्यासोबतच कामाची संधी दिली. 2020 मध्ये कोरोना आला आणि सारं काही लॉकडाऊन झालं. निलेश साबे याचा व्यवसाय देखील ठप्प पडला. आता कसं होणार? असा प्रश्न त्याच्यासमोर देखील उभा ठाकला. सगळीकडं लॉकडाऊन असलं तरी अमेरिकेत मात्र काही उद्योग सुरळीत सुरू होते. निलेशनं अमेरिकेतील उद्योजकांशी संपर्क साधला. अमेरिकेतील अनेक उद्योजकांनी निलेशला सकारात्मक प्रतिसाद दिला. अमेरिकेतील उद्योजकांची यशोगाथा निलेशच्या मासिकांमध्ये प्रकाशित व्हायला लागली. कोरोना काळ अनेकांसाठी संकटाचा असला तरी या कोरोना काळात निलेशनं मोठी झेप घेतली.
उद्योगाचा 'असा' झाला विस्तार : उद्योग विश्वासंदर्भात सुरुवातीला निलेश साबे यानं मासिक काढलं. अमेरिकेत त्याचं मासिक प्रसिद्ध व्हायला लागल्यावर त्याचा हा व्यवसाय अमेरिका आणि भारतातील उद्योग जगतात चांगलाच नावारुपास आला. पुढं या मासिक प्रकाशनासोबतच उद्योजकांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन निलेश साबेची 'स्विफ्ट एन लिफ्ट' कंपनी करायला लागली. आपल्या प्रॉडक्टची माहिती जगभर व्हावी यासाठी विशेष असं सॉफ्टवेअर 'स्विफ्ट एन लिफ्ट' कंपनीद्वारे विकसित करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर डेव्हलपमेंट सेक्युरिटी, सीसीटीव्ही सेक्युरिटी अशा सुविधा देण्यास सुरुवात झाली. उद्योजकांना त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त समाजात नवी ओळख मिळावी यासाठी 'स्विफ्ट एन लिफ्ट'द्वारे त्याला विशिष्ट पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. हा अवॉर्ड शो देखील कंपनीच्या भरभराटीसाठी महत्त्वाचा ठरला.
तरुणांना रोजगाराची संधी : 2018 मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान शाखेतील अभियंता म्हणून पुण्यात 12 हजार रुपयाची नोकरी दोन-तीन महिने करणारा निलेश साबे आज आपल्या कंपनीमध्ये शेकडो तरुणांना रोजगाराची संधी देतोय. आज निलेश साबे यांच्या 'स्विफ्ट एन लिफ्ट' कंपनीमध्ये 70 च्या वर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते काम करतात. 350 च्या वर एमबीए झालेले तरुण या कंपनीमध्ये आहेत. जनसंवाद शाखेतील 12 आणि ग्राफिक्स आणि व्हिडिओ एडिटिंग क्षेत्रातील 11 जणांना या कंपनीच्या माध्यमातून सध्य स्थितीत रोजगार उपलब्ध आहे. "कंपनीला आज आणखी शंभर ते दीडशे तरुणांची गरज असून, अमरावतीमधील माझ्या या महाविद्यालयातील तरुणांना मी जॉब देण्यासाठी आल्याचा मला आनंद होतो," अशी भावना निलेश साबे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
महाविद्यालयाला विद्यार्थ्यांचा अभिमान : "अतिशय साधारण घरातला विद्यार्थी आज 60 कोटी रुपयांचा टर्नओव्हर असणाऱ्या उद्योग समुहाचा मालक आहे ही साधी बाब नाही. 2018 मध्ये त्यानं पदवी मिळवली आणि अवघ्या पाच-सहा वर्षात इतकी उंच भरारी घेणाऱ्या निलेश साबे या विद्यार्थ्याचा आम्हाला अभिमान वाटतो," अशी प्रतिक्रिया विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी संचालित प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. दिनेश हरकुट यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष डॉ. उदय देशमुख, कोषाध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराज चौधरी, सदस्य नितीन हिवसे, डॉ. पुनम चौधरी, पंकज देशमुख, प्रा. विनय गोहाड, प्रा. गजानन काळे, प्रा. थोरात, प्रा.भगत यांनी आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी असणाऱ्या उद्योजक निलेश साबे याचा महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा निलेश साबेचं महाविद्यालयात स्वागत करताना व्यक्त केली.
'ईटीव्ही भारत'च्या स्पेशल स्टोरी खालीलप्रमाणे -
- विद्यार्थी झाले सेलफोन मुक्त; शिक्षकाच्या प्रयत्नांना यश - Amravati News
- अपघातात पाय गमावले; शिवणकाम आणि शिकवणी घेऊन घडवलं करिअर, जाणून घ्या सुनिता कुरकुटे यांची यशोगाथा - Sunita Kurkute
- "गावाकडं चल माझ्या दोस्ता..." माळरानावर विकसित केलं कृषी पर्यटन केंद्र, देशी-विदेशातील पर्यटक देतात आवर्जून भेट - AGRITOURISM News
- या पठ्ठ्याच्या कमाईनं गाठले दीड हजार रुपयांपासून तब्बल 36 कोटी रुपये : जाणून घ्या अशफाक चुनावाला यांची कहाणी - Success Story Of Ashfaque Chunawala
- तेलंगाणातील 'या' तरुणानं दोन वर्षांत मिळवल्या सहा सरकारी नोकऱ्या, तरुणांसाठी ठरतोय आशेचा किरण - Inspiring Journey