मुंबई Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मुंबईतील वरळी अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी आज (16 जुलै) न्यायालयात हजर केलं. सर्व पुरावे तपासल्यानंतर न्यायालयानं मिहीर शाहला 30 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
अपघातानंतर मिहीर शाह फरार : 7 जुलैला (रविवार) पहाटे वरळी परिसरात मिहीर शाहनं बीएमडब्ल्यू कार बेदरकारपणे चालवत एका जोडप्याला चिरडलं होतं. या अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. तर, प्रदीप नाखवा जखमी झाले होते. हे दोघेही वरळी येथील रहिवासी आहेत. दुचाकीला उडवल्यानंतर कावेरी नाखवा यांना मिहीरनं फरफटत नेलं होतं. त्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मिहीर शाह हा फरार झाला होता.
मिहीरला 9 जुलै रोजी अटक : मिहीर शाहला घटनेच्या तीन दिवसांनी (9 जुलै) अटक करण्यात आली होती. पोलिसांनी मंगळवारी (16 जुलै) त्याला शिवडी न्यायालयात हजर केलं होतं. मिहीर शाह हा शिवसेना नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. अपघातानंतर मिहीर पळून गेला होता. तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. दाढी, केस कापून मिहीर फरार झाला होता. त्यानं त्याचा फोनही बंद केला होता. मात्र, 60 तासांच्या शोध मोहिमेनंतर गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला अटक केली. त्याची आई, दोन मोठ्या बहिणींनी त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
वरळी अपघातावरुन राजकारण : वरळी अपघात हा शिवसेना नेते मिहीर शाह यांच्या मुलानं केला होता. त्यामुळं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर कोणीही असो, सर्वांना कायदा सारखाच असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते.
'हे' वाचलंत का :
- वरळी हिट अँड रन प्रकरण: अपघातग्रस्त वाहनावर याआधी झाली होती दंडात्मक कारवाई - Worli Hit And Run Case
- वरळी हिट अँड रन प्रकरण; आरोपी मिहीर शाहाचा वाहन परवाना होणार रद्द, पोलीस आरटीओला लिहिणार पत्र - Worli Hit And Run Case
- वरळी हिट अँड रन प्रकरणाचा 'सीन रिक्रियेट' होणार; आरोपी आणि ड्रायव्हरच्या जबाबात विसंगती - Worli Hit And Run Case