छत्रपती संभाजीनगर World Water Day 2024 : मार्च महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच, यंदा मात्र भीषण पाणी टंचाईचं संकट मराठवाड्यावर घोंगावत आहे. यावर्षी विभागातील 104 जलसाठे कोरडे पडले आहेत. इतर प्रकल्पांमध्ये अवघा 25 टक्के जलसाठा शिल्लक असल्यानं पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण होणार आहे. मागील वर्षी याच काळात 57 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र यंदा अनेक प्रकल्प कोरडे पडल्यानं पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट मराठवाड्यावर दिसून येतंय. तर दुसरीकडं कष्टानं जोपासलेली फळबाग जिवंत ठेवणं अवघड झाल्यानं शेतकरी आपल्या हातानं ती तोडत असल्याचं चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळतंय.
प्रकल्प गाठू लागले तळ : मराठवाड्यात सध्या पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झालीय. विभागात असलेल्या अनेक प्रकल्पांनी तळ गाठलाय तर काही कोरडे पडलेले आहेत. विभागाचा विचार केला तर 267 प्रकल्पांमध्ये सध्या 25 टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा नोंदवला गेलाय. त्यात मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण आणि संभाजीनगर जालना शहरासाठी महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणात अवघा 24 टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर विभागात 104 प्रकल्प पूर्णतः कोरडे पडले आहेत. त्यामुळं आगामी तीन महिने ग्रामीण भागात अतिशय अडचणीचे ठरणार आहेत. मराठवाड्यात लहान-मोठे 800 हून अधिक प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी क्षमता 8 हजार 155 दलघमी इतकी आहे. मात्र मार्च महिन्यातच अवघा 2 हजार 43 दलघमी जलसाठा शिल्लक असल्यानं, पाण्याची चिंता वाढलीय. पिण्याचं पाणी तसंच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात भीषण होणार हे मात्र नक्की.
टँकरची मागणी वाढणार : मराठवाडा यावर्षी पुन्हा भीषण पाणीटंचाईला सामोरा जाणार आहे. त्या अनुषंगानं टँकरची उपलब्धता करण्यासाठी प्रशासनानं तयारी सुरू केलीय. आजघडीला संभाजीनगर-जालना या दोन जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. टंचाईग्रस्त भागात 374 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय. जिल्हा प्रशासनानं काही ठिकाणी विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. तर काही ठिकाणी खासगी टँकरची व्यवस्था देखील करायला सुरुवात केलीय. मार्च महिन्यातच असलेली ही परिस्थिती पाहता पुढील तीन महिने सूक्ष्म नियोजनाची गरज पडणार आहे. त्या अनुषंगानं विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेत प्रशासनाला योग्य ते निर्देश देखील दिले आहेत.
पाण्याअभावी तोडली फळबाग : पाण्याअभावी ग्रामीण भागात फळबागांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. विशेषतः मोसंबी आणि डाळिंब या पिकांना पाणी अधिक लागतं आणि त्यामुळं ही झाडं तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. जिल्ह्यातील लाडसावंगी गावातील राजेंद्र पवार या शेतकऱ्याकडे मोसंबी आणि डाळिंबाची झाडं आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या शेतातील फळबाग कष्टानं फुलवली होती. मात्र पाणीच नसल्यानं तिच्यावर कुऱ्हाड फिरवण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. त्यांनी आपल्या शेतातील मोसंबीची 700 तर डाळिंबाची 500 झाडं काढून टाकली आहेत. शेतामध्ये शेततळं उभारलं. मात्र त्यातही पाणी नसल्यानं झाडं जगवायची कशी असा भीषण प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. पाच वर्षात मोठ्या कष्टानं खर्च करुन झाडं वाढवावी लागली. मात्र तीच काढण्याची वेळ आल्याचं दुःख राजेंद्र पवार यांनी व्यक्त केलं. आता दोन महिने नेतेमंडळी प्रचारात व्यग्र असतील, या काळात तरी शेतकऱ्यांना सरकारनं अनुदान किंवा मदत द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा :