शिर्डी World Sparrow Day 2024 : लहान असताना 'चिऊताई'चं अंगाई गीत कानावर पडलं की लगेच झोप लागत असे. आजीच्या कथेतही चिमण्यांचा उल्लेख नेहमी येत असे. मात्र, गेल्या काही दशकांपासून चिमण्यांवर ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. शहरीकरण, वाढतं तापमान, जंगलतोड, अवकाळी पाऊस, सततचा दुष्काळ या कारणामुळं चिमण्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं चिमण्याचं संवर्धन करणं प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे.
चिमण्याच्या संख्येत घट : देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात 'चिऊताई'चा चिवचिवाट दिसून येतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चिमण्याच्या संख्येत घट होताना दिसत आहे. चिमण्यांच्या संख्येत घट होण्यामागं विविध कारणं आहेत. अधुनीकीकरणामुळं चिमण्यांची संख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहेत. मानवी वस्तीजवळ राहणारी चिमणी नेहमीचं मानवापासून चार हात लांब राहते. घरातील छतावर, झाडांवर यांचं मुख्यत: वास्तव्य असतं. चिमणी हा पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग असल्यानं चिमणी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी 20 मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. मोहम्मद दिलावर यांनी 2006 मध्ये 'नेचर फॉरएव्हर सोसायटी' नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या पुढाकारानं 2010 मध्ये जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला होता.
रेडिएशनमुळं चिमण्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम : 'माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाल्यानं त्याचा चिमण्यांवर घातक परिणाम होत आहे. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळं अनेक पक्ष्यांचा जीव धोक्यात आला आहे. पक्ष्यांच्या या यादीत चिमण्यांचाही समावेश आहे. रेडिएशन केवळ चिमण्यांना घातक नाही, तर त्यांच्या प्रजनन क्षमतेवरही गंभीर परिणाम करते. त्यामुळं चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे', असं पक्षी मित्र स्वप्नील जोशी यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट : चिमण्यांच्या घटत्या संख्येमुळं विविध परिसंस्थांवर गंभीर परिणाम होत आहेत. चिमण्यांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम शेतातील पिकांवर देखील दिसून येतोय. पिकांवर होणाऱ्या रोगांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे चिमण्यांचं मुख्य अन्न अळ्या, लहान किडे आहे. मात्र, या अळ्या किडे मारण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणा किटकनाशकांचा वापर करत आहेत. त्यामुळं चिमण्याच्या अन्नाचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडं चिमण्यांची संख्याचं कमी झाल्यानं पिकांवर पुन्हा एकदा किटकांचा प्रभाव वाढताना दिसतोय. त्यामुळं शेतकऱ्याच्या उत्पादनात घट होताना दिसतेय.
हे वाचलंत का :