कोल्हापूर World Donkey Day : मूर्खपणाचा सजीव दाखला म्हणून अनेक जण गाढवाचं उदाहरण देतात, मात्र दैनंदिन जीवनात गाढव प्राणी किती उपयोगाचा आहे, त्याची प्रचिती आज जागतिक गाढव दिनाच्या निमित्तानं आलीय. 'जगावेगळं पुरेपूर ते सगळं कोल्हापूर' अशी म्हण रांगड्या कोल्हापुरात प्रसिद्ध आहे. त्याच कोल्हापूरकरांनी आज चक्क जागतिक गाढव दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. तसंच त्याला सामाजिक उपक्रमाची जोडही दिली. कोल्हापुरातील निसर्ग मित्र या संस्थेनं आज या गाढव दिनाचं औचित्य साधून गाढवांना लागणारं खाद्य समाजातील महिलांकडून जमा केलं. याला कोल्हापुरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. अत्यंत गरीब कष्टाळू, तितकाच प्रामाणिक मात्र, कायमच कुचेष्टेचा, तिरस्काराचा विषय राहिलेला 'गाढव' मानव जातीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे, हे आज या निमित्तानं स्पष्ट झालं.
कोल्हापूर जिल्ह्यात अवघी 300 गाढव : संयुक्त राष्ट्रानं यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय दुधाळ जनावर संवर्धन वर्ष म्हणून घोषित केलं आहे. या निमित्तानं कोल्हापुरातील निसर्ग मित्र संस्थेच्या वतीनं आज जागतिक गाढव दिनाच्या निमित्तानं या विशेष उपक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात 2019 च्या पशु जनगणनेनुसार 18 हजार गाढवांची नोंद करण्यात आलीय. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात अवघी 300 गाढव असल्याची सरकारी आकडेवारी आहे. वाढतं शहरीकरण, बदललेल्या जीवनशैलीमुळं गाढवांचा रोजच्या कामातील वापर आता कमी झाला आहे. कायमच उपेक्षित राहिलेल्या गाढवांना उकिरडा हा आपल्या पोट भरण्याचा आधार वाटतो. मात्र, या उकिरड्यावरील प्लास्टिक खाल्ल्यामुळं अनेक गाढवांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा पशुवैद्यकीय कार्यालयाकडं आढळते.
निसर्ग मित्र संस्थेचा पुढाकार : बहुउपयोगी गाढव जगली पाहिजेत, या उद्देशानं कोल्हापुरातील बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष अनिल चौगुले यांच्या संकल्पनेतून 'गाढवांसाठी चारा' हा उपक्रम कोल्हापुरात राबवण्यात आला. खासकरून महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत, घरातील जेवणापूर्वीचा कचरा संस्थेकडं जमा करण्याला सुरुवात केली. यामध्ये निवडलेल्या भाज्यांचे देठ, पानं, फळांच्या सालीचा समावेश आहे. मिळालेला चारा शहराजवळील बालिंगा, नागदेववाडी येथील गाढव मालकांकडं सुपूर्त करण्यात आला. चारा उपलब्ध करून देणाऱ्या गृहिणींना संस्थेकडून साठवणुकीच्या धान्यात उपयोगी ठरणाऱ्या कडुनिंबाच्या गोळ्या देण्यात आल्या. गाढव संवर्धनासाठी कोल्हापूरकरांच्या पाठिंब्यानं उचललेले हे पाऊल नक्कीच समाजाला नवी दिशा देईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष अनिल चौगुले यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केला.
गाढव संवर्धनासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात : कोल्हापूर जिल्ह्यात 300 हून अधिक गाढव आहे. गाढव संवर्धनासाठी त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही सध्या गंभीर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्यास गाढव मालकांना या प्राण्याचे संगोपन करण्यासाठी मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया पशु मालक राजू माने यांनी व्यक्त केलीय. तर वीटभट्टीच्या कामांमध्ये माणसाप्रमाणे या प्राण्याचा उपयोग होतो, अशी प्रतिक्रिया तातोबा डांगे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली.