अमरावती Women Special bullfestival : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण सलग दोन दिवस साजरा करण्यात आल्यावर आज तिसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात तिवसा येथे खास शेतकरी महिलांसाठी पोळ्याचा उत्सव आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला. या महिला स्पेशल पोळा उत्सवात स्वतः पारंपरिक वेशभूषेत नटून थटून आलेल्या महिलांनी आपल्या घरची सजवलेली बैलजोडी देखील आणली.
बैलजोडींवर सामाजिक आणि राजकीय संदेश - सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर असणाऱ्या अडचणी या संदर्भातील शेतकऱ्यांच्या वेदनांची माहिती बैलांच्या अंगावर टाकण्यात आलेल्या झुलींवर अंकित करण्यात आली. शासनानं शेतकऱ्यांना मदत करावी या संदर्भात देखील निवेदन स्वरूपातील माहिती अनेक बैलांवरील झुलींवर वाचायला मिळाली. महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या याकडे देखील महिलांच्या या बैलपोळ्यामध्ये लक्ष वेधण्यात आलं.
जिल्ह्यात पहिलाच उपक्रम - महिलांचा बैलपोळा हा अमरावती जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आहे. गत पाच वर्षांपासून महिलांचा पोळा आयोजित करण्याचे नियोजन आमदार यशोमती ठाकूर यांनी केलं. कोविड काळामुळे महिलांचा बैलपोळा आयोजित करता आला नाही गतवर्षी मोजक्या महिलांनी बैलपोळामध्ये आपल्या बैलजोडी आणल्या होत्या. यावर्षी मात्र तिवसासह एकूण चार तालुक्यातील महिला मोठ्या संख्येनं या बैलपोळ्यात सहभागी झाल्याचा आनंद आमदार यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
प्रत्येक बैल जोडीला साडेतीन हजार रुपयांचं बक्षीस - आमदार यशोमती ठाकूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या स्पेशल बैलपोळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बैलजोडीला साडेतीन हजार रुपयांची सन्मान धनराशी देण्यात आली. यासह सर्वात उत्कृष्ट बैल जोडीला रोख पंचवीस हजार रुपयांचं पहिलं पारितोषिक, 15000 रुपयांचा द्वितीय, 11000 रुपयांचं तृतीय तर चौथ्या क्रमांकावरील बैल जोडीला साडेसात हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आलं. महिलांच्या या बैलपोळ्याला प्रचंड गर्दी उसळली. जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या सोहळ्यात उपस्थित होते. यावेळी मेळघाटातील आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या गझली नृत्यात खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील ठेका धरला.
हेही वाचा...