ठाणे Ganesh Ghol Temple Gang Rape : कौटुंबिक त्रासाला कंटाळून पीडितनं शिळफाटा येथील गणेश घोळ मंदिरात देवाच्या चरणी धाव घेतली, पण मंदिरात वावरणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांनी तिच्यावर रात्रभर आळीपाळीनं केला. त्यानंतर त्यांनी पीडितेची हत्या केल्याची घटना 6 जुलै 2024 रोजी घडली होती. या पीडितेचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी डायघर पोलिसांनी मंदिराचे पुजारी राजकुमार रामफेर पांडे (54), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (45), श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (62) यांना चिता कॅम्प ट्रॉम्बे, मुंबई येथून अटक केली. आरोपींनी सामूहिक अत्याचार, खून केल्याची कबुली दिलीय.
अशी घडली घटना : नवी मुंबईतील एनआरआय पोलीस स्टेशन हद्दीतील राहणारी 30 वर्षीय विवाहित महिला कौटुंबिक कलहाला कंटाळून 6 जुलै रोजी सकाळी शिळफाटा घोळ गणपती मंदिरात आली होती. या मंदिरात श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (वय 62, कोटा, राजस्थान), संतोष कुमार रामयज्ञ मिश्रा (45) रा. प्रतापगड, यूपी, राजकुमार रामफेर पांडे (५४) रा. प्रतापगड, यूपी येथे कार्यरत होते. श्यामसुंदर प्यारचंद शर्मा यांनीच उत्तर प्रदेशातील संतोष कुमार तसंच राजकुमार यांना मंदिरात बोलावलं. ३० वर्षीय पीडित ही मंदिरात बसून होती. नराधमांनी तिला दुपारचं भोजन दिलं. त्यानंतर संध्याकाळी चहा देताना त्यात भांग मिसळून दिला. शुद्ध हरपलेल्या पीडितेवर रात्रभर या पुजाऱ्याच्या वेषातील नराधमांनी आळीपाळीनं सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी पीडितेला मंदिरामागील बाजूस खोल दरीत नेऊन तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह जंगलात फेकला. मात्र, दोन दिवसांनी 9 जुलै 2024 रोजी मंदिरात गेलेल्या एक भक्ताला महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला.
तिघांना अटक : डायघर पोलिसांनी ओळख पटल्यानं विविध दिशेने तपास केला. पोलिसांनी घोळ मंदिर परिसरातील सर्व आसपासचे सीसीटीव्ही तपासले. त्यात पोलिसांना घोळ गणपती मंदिरातील पुजाऱ्यांवर संशय बळावला. पोलिसांनी कौशल्यानं मंदिरातील हालचालींबाबत माहिती मिळवली. त्यानंतर दोन आरोपी जाळ्यात अडकले. पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा, राजकुमार रामफेर पांडे यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तिसरा आरोपी श्यामसुंदर प्यारचंद शर्मा याचाही समावेश असलयाचं सांगितलं. त्यानंतर पोलीस पथकानं श्यामसुंदर प्यारचंद शर्माला चित्ता कॅम्प मुंबई परिसरातून अटक केली.