मुंबई Fraud In Mumbai : कुख्यात ठग श्वेता बडगुजरवर पुन्हा फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्टम विभागानं जप्त केलेली गोल्ड कॉइन, महागडी घड्याळं देण्यासोबत फ्लॅट विक्रीचा बहाणा करुन श्वेता बडगुजरनं महिलेची फसवणूक केल्याचं उघड झालं. श्वेता बडगुजरनं दादरमधील 71 वर्षीय व्यवसायिक महिलेची 1.62 कोटींची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दादर पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त संदीप भागडीकर यांनी दिली आहे.
कपडे दुकानात झाली श्वेता बडगुजसोबत ओळख : प्रभादेवीतील 71 वर्षीय तक्रारदार महिला या बेकरीचा व्यवसाय करतात. त्याचप्रमाणं बेकरी अँड कन्फेक्षनरी कोर्सच्या शिकवण्या घेतात. त्यांचं प्रभादेवी परिसरात कार्यालय आणि वर्कशॉप आहे. मिस्टर अँड मिसेस दादर फॅशन शोमध्ये सहभागी झाल्यानं त्या 8 जुलै 2021 मध्ये येथील एका कापडाच्या दुकानात गेल्या असताना त्यांची श्वेता बडगुजर हिच्याशी ओळख झाली.
उच्च न्यायालयामध्ये सरकारी वकील असल्याची मारली थाप : पीडित महिला या सप्टेंबर 2021 मध्ये दादरमधील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना उशीर झाल्यानं श्वेता बडगुजर हिनं तिच्या गाडीतून त्यांना घरी सोडलं होतं. यावेळी तिनं "मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरकारी वकील असून तिची दुबई इथं चांगली ओळख आहे. दुबईमध्ये शेफसाठी क्लासेस सुरु करून देण्यास मदत करेन," असं तिनं सांगितलं होतं.
बाजार भावापेक्षा कमी दरात गोल्ड कॉइन्स देण्याचं आमिष : ऑक्टोबर महिन्यात श्वेता बडगुजरनं तक्रारदार महिलेच्या घरी येऊन "माझा भाऊ पियुश प्रधान हा मुंबई कस्टममध्ये सिनियर ऑफीसर आहे. तो कस्टम विभागाच्या ऑक्शनमधील गोल्ड कॉइन्स विकत घेतो. ही गोल्ड कॉइन्स बाजार भावापेक्षा कमी दरात मिळवून देतो," असं सांगितलं. श्वेता बडगुजर हिनं 110 ग्रॅमच्या कॉइन्स 47 हजार रुपयांत देतो. हेच कॉइन्स पुढं 52 हजार रुपयांत विक्रीकरुन पाच हजार रुपये फायदा मिळवून देण्याचं आमिष दाखविलं.
गोल्ड कॉइन्स, घड्याळं, फ्लॅट देण्याचं आमिष : श्वेता बडगुजर हिच्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार महिलेनं गुंतवणूक केली. श्वेता बडगुजरनं त्यांना नफा मिळवून दिला. नंतर तक्रारदार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी 76 लाख 35 हजार 500 रुपये गुंतवणूक केली. तसेच, श्वेता बडगुजर हिनं फ्लॅट मिळवून देण्याचं आमीष दाखवून 68 लाख रुपये आणि कस्टम विभागानं जप्त करुन ऑक्शनमध्ये काढलेली डिटोना, रोलॅक्स आणि सी मास्टर या कपंनीची महागडी घड्याळं स्वस्तात मिळवून देण्याचं आमिष दाखवून 15 लाख रुपये असे एकूण 1 कोटी 62 लाख 85 हजार 500 रुपये घेतले.
श्वेता बडगुजर विरोधात अनेक गुन्हे दाखल : तक्रारदार महिलेसह नातेवाईकांना ना गोल्ड कॉइन, ना फ्लॅट, ना महागडी घड्याळं मिळाली. ना दिलेले पैसे मिळाले. अखेर संशय आल्यानं तक्रारदार महिलेनं चौकशी केली असता, त्यांची फसवणूक झाल्याची खात्री पटली. अखेर, त्यांनी दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप भागडीकर यांनी दिली आहे. श्वेता बडगुजर हिच्या विरोधात मुंबईतील वांद्रे इथं तीन, वाकोला, मुलुंड, कांदिवली, ओशिवरा, डि. एन. नगर आणि ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा :