मुंबई Congress with Nandurbar : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी भारत जोडो न्याय यात्रेचा टप्पा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून सुरू केला. नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. 1952 पासून ते 2014 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजानं नेहमीच काँग्रेस, गांधी परिवाराला साथ दिली आहे. त्यामुळं नंदुरबार जिल्हा गांधी परिवारानं कायम आपल्याशी जोडून ठेवला आहे. त्यामुळंच पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सुरू झालेली ही परंपरा राहुल गांधी यांनीही कायम ठेवली आहे. त्यांनी त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा टप्पा नंदुरबारमधून सुरू केलाय.
काय आहे काँग्रेसचं 'नंदुरबार'शी नातं : या संदर्भात बोलताना आदिवासी जनसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या, 1952 मध्ये देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, तेव्हा नंदुरबारचे तत्कालीन उमेदवार ए. डी. चौधरी यांना पंडित नेहरूंपेक्षा जास्त मतं मिळाली होती. 1962 मध्ये या मतदारसंघातून प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार लक्ष्मण वळवी यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 1967 ते 2014 पर्यंत या मतदारसंघात केवळ काँग्रेसच्या उमेदवारांनी विजयी मिळावलाय. माणिकराव गावित यांनी याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर तब्बल नऊ वेळा बाजी मारलीय. या मतदारसंघात काँग्रेसनं कुणालाही उमेदवारी दिली तरी तो निवडून येणार याची खात्री इंदिरा गांधींना होती. 1977 मध्ये आणीबाणी जाहीर झाली, तेव्हा काँग्रेसला सर्वत्र अपमानाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र केवळ नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या उमेदवारानं मोठ्या मताधिक्यानं विजयी मिळवला होता.
देशातील क्रमांक एकचा मतदारसंघ : त्यावेळी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी नंदुरबार हा देशातील क्रमांक एकचा मतदारसंघ म्हणून जाहीर केला होता. आजही देशातील पहिली महिला मतदार म्हणून नंदुरबारमधील मणिबेली गावातील महिलेचा गौरव केला जातो, असंही शिंदे यांनी सांगितलं. इंदिरा गांधी यांनी नेहमीच नंदुरबार मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली होती. त्यानंतर राजीव गांधींनीही या मतदारसंघांतून आपला प्रचार सुरू करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली.
सोनिया गांधीही नंदुरबारमधून राजकारणात सक्रिय : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनीसुद्धा 1998 मध्ये राजकारणामध्ये प्रवेश करताना नंदुरबारमध्ये पहिली सभा घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 33 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या.
योजनांची सुरुवात नंदुरबारमधून : यूपीए सरकारच्या काळात अनेक नव्या योजनेची सुरुवात नंदुरबारमधून करण्यात आली आहे. म्हणूनच 2010 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग तसंच सोनिया गांधी यांनी आधार कार्ड योजनेची सुरवात नंदुरबारच्या टेंभली गावातून केली होती. त्यामुळंच राहुल गांधी यांनी नंदुरबारमधून भारत जोडो न्याय यात्रेच्या टप्प्याला सुरवात केली. यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नातवाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी नागरिकांनी गर्दी केली होती. यातूनच गांधी परिवार तसंच नंदुरबारमधील आदिवासी समाज आजही परस्परांशी जोडले असल्याचं शिंदे सांगतात.
नैसर्गिक संपत्तीवर आदिवासींचा अधिकार : राहुल गांधी यांनी नंदुरबारमधून भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात करताना नंदुरबारसह गांधी घराण्याचं असलेलं नातं पुन्हा एकदा विशद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना त्यांनी आदिवासी समाज नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी असल्याची आठवण करून दिली. आदिवासी हेच या देशाचे खरे मालक असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. या देशातील जल, जंगल, जमीन यावर आदिवासींचा पहिला हक्क आहे. मात्र भारतीय जनता पक्ष आदिवासींचे वनवासी म्हणून हक्क हिरावून घेत आहे. भाजपा सरकार दलित, आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेऊन अदानींना देत आहे. आदिवासींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात आहे. पण काँग्रेस पक्ष आदिवासींच्या हक्कांचं रक्षक आहे. देशाच्या लोकसंख्येत 8 टक्के आदिवासी लोकांचा समावेश आहे. मात्र, त्या प्रमाणात त्यांची सत्तेत भागिदारी नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर हे चित्र बदलेल. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना त्यांचे हक्क दिले जातील. आदिवासींचे जल, जंगल, जमीन यांचे हक्क अबाधित ठेवण्याचं काम काँग्रेस करणार असल्याचं खासदार राहुल गांधी यांनी म्हटलंय.
केंद्रात काँग्रेसची सत्ता येईल : या संदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आदिवासी, दलित, गरीब वर्ग नेहमीच काँग्रेससोबत आहे. काँग्रेसची धोरणे, विकासाच्या योजनांना नेहमीच आदिवासी समाजानं पाठिंबा दिला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातत्यानं काँग्रेसचा खासदार निवडून येणं, हे त्याचंच लक्षण आहे. म्हणूनच राहुल गांधी यांनी या मतदार संघातून आपली यात्रा सुरू केली. नंदुरबारमधून जेव्हा काँग्रेसचा खासदार निवडून येतो, तेव्हा केंद्रात काँग्रेसचं सरकार येतं. यावेळीसुद्धा नंदुरबारचा खासदार काँग्रेसचाच होईल. केंद्रात पुन्हा एकदा काँग्रेसचंच सरकार येईल, असा दावा पटोले यांनी यानिमित्तानं केला.
आदिवासी पट्ट्यात काँग्रेसला साथ : या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक किरण नाईक म्हणाले, नंदुरबार, धुळे, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये सातत्यानं काँग्रेसला आदिवासी समाजानं साथ दिली आहे. काँग्रेसचा हात या पलीकडं या समाजाला फारशी निवडणूक चिन्हंसुद्धा माहीत नाहीत. त्याबाबतीत त्यांनी अन्य पक्षावर फारसा विश्वास दाखवल्याचं दिसत नाही. या पट्ट्यात काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष नेहमीच जिंकत आले आहेत. राहुल गांधी यांच्या नंदुरबार येथील सभेला म्हणूनच पुन्हा एकदा गर्दी झाली. आदिवासी समाज हा आपल्यासोबत आहे, तो कायम आपल्याच सोबत राहावा, यासाठीच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नंदुरबार, धुळे, पालघर, ठाणे या आदिवासी पट्ट्यातूनच आपली भारत जोडो न्याय यात्रा काढली आहे. त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल, असं मत किरण नाईक यांनी व्यक्त केलं आहे.
हे वाचलंत का :
- Lok Sabha Election 2024 : लोकसभेचे वेळापत्रक उद्या जाहीर होणार, निवडणूक आयोग दुपारी घेणार पत्रकार परिषद
- Bharat Jodo Nyay Yatra: गरिबांवर अन्याय होत असल्यानं 'न्याय' हा शब्द यात्रेत जोडला- राहुल गांधी
- Rahul Gandhi News: राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा'मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात पोहोचणार; कार्यकर्त्यांची जय्यत तयारी