कोल्हापूर Vishalgad Encroachment : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडावर आज स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहीम राबवण्यात आली होती. मात्र, या आंदोलनाला विशाळगडाच्या पायथ्याशी हिंसक वळण लागलं. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी गजापूर हद्दीतील अनेक घरांना लक्ष करत दगडफेक केल्याचा आरोप होत आहे. घरातील प्रापंचिक साहित्य रस्त्यावर टाकून नुकसान करण्यात आलं, विशाळगडाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेली प्रार्थना स्थळं, दुकानं, चहाच्या टपऱ्याची तोडफोड करण्यात आल्याचाही आरोप आहे. यावेळी बंदोबस्ताला असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह जिल्हा पोलीस दल जमावा पुढं हतबल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं : आज सकाळी कोल्हापुरातील भवानी मंडपात भवानी मातेचं दर्शन घेऊन संभाजी राजे छत्रपती विशाळगडाकडे निघाले. विशाळगडावर पोहोचण्याआधी राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी विशाळगडाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी गर्दी केली होती. मात्र, विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर हद्दीत हिंसक झालेल्या जमावानं रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांवर आणि प्रार्थना स्थळावर दगडफेक करुन मोठं नुकसान केलं, तर अनेक घरातील प्रापंचिक साहित्य रस्त्यावर आणून त्याची तोडफोड करण्यात आली. छत्रपती संभाजी राजे विशाळगडावर पोहोचल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आंदोलन मागं घेण्याची विनंती केली. मात्र, झालेल्या अतिक्रमणाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका संभाजी राजे छत्रपती यांनी घेतली. यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी घरं, दुकान आणि प्रार्थना स्थळांची तोडफोड करुन प्रचंड नुकसान केलं होतं. दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी उद्यापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
जिल्हा पोलीस दलाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह : विशाळगड परिसरात स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका जाहीर करुन देखील विशाळगडावरील अतिक्रमण मुक्ती आंदोलनादरम्यान पोलीस कुमक कमी प्रमाणात ठेवण्यात आली होती. राज्यभरातून मोठ्या संख्येनं शिवभक्त याठिकाणी दाखल झाल्यानं पोलिसांची तारांबळ उडाली. अक्षरशः पोलिसांसमोरच अनेक दुकानांची तोडफोड करण्याच्या घटना यावेळी घडल्या. अवघ्या तीनशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त याठिकाणी होता तर राज्यभरातून हजारो शिवभक्त या ठिकाणी दाखल झाले होते.